कणकवली : श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण असलेली नागपंचमी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. जिल्ह्यातील घरोघरी मातीच्या नागमूर्तीची स्थापना करून मनोभावे पूजा करण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
सकाळपासूनच घराघरांत पाटावर अळूचे पान ठेवून त्यावर नागमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तांदूळ, खीर, लाह्या आणि गुळाचा नैवेद्य दाखवून नागदेवतेची पूजा करण्यात आली. या सणानिमित्त अनेक मुंबईकर चाकरमानी आपल्या मूळ गावी परतल्याने जिल्ह्यातील अनेक बंद घरे पुन्हा गजबजली होती. सायंकाळी या मूर्तींचे घराजवळील परसबागेत विसर्जन करण्यात आले.
याच दिवशी अनेक कुटुंबांनी गणेश मूर्तिकारांकडे जाऊन लाकडी पाट देत गणेशमूर्तीची नोंदणी करण्याची प्रथाही जपली. यामुळे आता नागपंचमीनंतर जिल्हावासीयांना वेध लागले आहेत ते गणेशोत्सवाचे.