कणकवली ः सिंधुदुर्गात नगरपालिका व नगरपंचायत निवडणूकांमध्ये भाजप व शिवसेना शिंदे गटामध्ये युती अद्यापही झालेली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत, मात्र युती बाबत कोणतीही अधिकृत घोषणा दोन्ही पक्षांकडून स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे युतीची शक्यता धुसर झाली आहे.
कणकवलीत न.पं.च्या निवडणूकीमध्ये भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वतंत्र उमेदवार उभे करणार की शहर विकास आघाडीसोबत जाणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
महाराष्ट्राच्या सत्तेत एकत्र असणारे भाजप व शिवसेना शिंदे गट सिंधुदुर्गात नगरपालिका निवडणुकीमध्ये एकमेकांसमोर लढण्याची जोरदार शक्यता आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांनी भाजपा स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे भूमिका घेतली होती. मात्र सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या खा. नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत भाजप शिवसेनेमध्ये युती होणार असल्याचे सांगितले होते. खा. राणे यांनी घेतलेल्या भुमिकेनंतर दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र या चर्चामधून नेमका कोणता निर्णय झाला हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
सावंतवाडी व वेंगुर्ले नगरपालिकेसाठी भाजप व शिवसेनेकडून उमेदवार उभे करण्यात आले आहेत. वेंगुर्लेत नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून दिलीप गिरप तर शिंदे शिवसेनेकडून नागेश गावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी शिंदे शिवसेनेचे आ.दीपक केसरकर व भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सावंतवाडीमध्ये रविवारी दोन्ही पक्षांमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले. भाजपने नगराध्यक्ष पदासाठी श्रद्धाराजे सावंत-भोसले यांच्यासह नगरसेवक पदासाठी 14 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र पक्षाकडून त्यांना सोमवारी एबी फॉर्म दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. शिंदे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी ॲड. नीता सावंत-कविटकर यांच्यासह 20 नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले असून त्यांना पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आले आहेत. शिवसेनेने एबी फॉर्म जोडल्याने त्याची राजकीय चर्चा सुरू आहे.
सावंतवाडीत दोन्ही पक्ष एकमेकांसमोर ठाकले असून शिंदे शिवसेनेचे नेते ही प्रेमाची लढाई आहे. मैत्रीपूर्ण लढत असल्याचे सांगत आहेत. तर दुसरीकडे भाजपचे स्थानिक नेते आव्हानात्मक वक्तव्य करत असल्याने दोन्ही पक्षांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. मालवण नगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेसेनेचे आ. नीलेश राणे उपस्थित होते. यावेळी त्यांनी आम्ही विकास सोडून कुठल्याही विषयावर बोलणार नाही. आम्ही आव्हान देत नाही आणि आव्हान घेत नाही असे सांगितले आहे. काहींच्या मते त्यांनी एकप्रकारे मित्र पक्षालाच हे सूचित केले आहे. दोन्ही पक्षातील नेते आणि पदाधिकारी सध्यातरी स्वतंत्र लढण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. खरे चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी स्पष्ट होणार असले तरी दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली युती होण्याची शक्यता मावळत आहे.