Konkan Ro-Ro service update
सिंधुदुर्ग: गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतील माझगाव ते सिंधुदुर्गातील ऐतिहासिक विजयदुर्ग बंदर यादरम्यान बहुप्रतिक्षित सागरी रो-रो (M2M) सेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या सेवेसाठी विजयदुर्ग बंदरात जेट्टी उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, गणेश चतुर्थीपूर्वी ही सेवा प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची दाट शक्यता आहे.
सिंधुदुर्ग बंदर विभागाच्या देखरेखीखाली विजयदुर्ग बंदरात मागील आठ दिवसांपासून जेट्टी उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. सध्या या ठिकाणी तरंगते प्लॅटफॉर्म (Floating Pontoons) बसवण्याचे काम केले जात आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी १० ते १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या गर्दीपूर्वी, म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दोन-तीन दिवस आधी ही सेवा सुरू करण्याचे नियोजन असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या महत्त्वाकांक्षी सेवेबद्दल अधिक माहिती देताना बंदर निरीक्षक अधिकारी श्री. उमेश महाडीक म्हणाले, "जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर रो-रो बोटीची यशस्वी चाचणी (Test Drive) घेतली जाईल. ही चाचणी सर्व निकषांवर यशस्वी ठरल्यानंतरच प्रवाशांसाठी तिकीट बुकिंग सुरू करण्यात येईल. सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल."
मुंबई ते विजयदुर्ग या सागरी प्रवासासाठी अंदाजित तिकीट दरही समोर आले आहेत. तथापि, हे दर अंतिम नसून प्रवासी आणि वाहनांच्या संख्येनुसार त्यात बदल होऊ शकतो. ही सेवा सुरू झाल्यास मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल, शिवाय प्रवाशांना एक जलद आणि आरामदायी पर्याय उपलब्ध होईल. कोकणच्या पर्यटन विकासालाही या सेवेमुळे मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रवासी भाडे (प्रति व्यक्ती): 600 रुपये ते 1 हजार रुपये
चारचाकी गाडी भाडे: 1500 रुपये ते 2 हजार रुपये