Ro-Ro service | रो-रो सेवा दिवास्वप्नच!

रो-रो सेवेसाठी आवश्यक जेटी नसल्याने चाकरमान्यांच्या आनंदावर विरजण
Lack of jetty for Ro-Ro service dampens festive spirit of commuters
रो-रो सेवा दिवास्वप्नच!
Published on
Updated on
शशिकांत सावंत

सध्या भाऊचा धक्का ते मांडवा अशी सुरू असलेली रो-रो सेवा सिंधुदुर्गपर्यंत विस्तारणार असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती. ऐन गणपती उत्सवाच्या काळात ही सेवा सुरू होणार असल्याने चाकरमान्यांमध्ये आनंदी आनंद होता; मात्र सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत रो-रो सेवेसाठी आवश्यक जेटी नसल्याने चाकरमान्यांच्या आनंदावर सध्या तरी विरजण पडले आहे.

कोकण रेल्वेची गणपती उत्सवाचे बुकिंग तीन मिनिटांत हाऊसफुल्ल झाले आणि सार्‍यांच्या नजरा रो-रो सेवेकडे लागल्या होत्या. रो-रो सेवेमध्ये अडीचशे गाड्यांसह जाता येत असल्याने अनेकांनी नादुरुस्त मुंबई-गोवा महामार्गापेक्षा रो-रो बरी असा विचार करून त्याचे बुकिंग कधी सुरू होणार, याकडे नजरा लावल्या होत्या; पण रो-रो सेवा सुरू होण्याला सध्यातरी ब—ेक लागल्याने आता मुंबई-गोवा महामार्ग कधी सुरू होणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. दरवर्षी कोकणात गणेशोत्सवासाठी 25 ते 30 लाख चाकरमानी गावचा रस्ता धरतात. सध्या रेल्वेची दर दिवशीची क्षमता ही पाच हजार प्रवासी जाण्याची आहे. एकूण गणपतीच्या पहिल्या दहा दिवसांत फार तर दोन ते तीन लाख प्रवासी जाऊ शकतात. त्यामुळे अनेक चाकरमान्यांसमोर रस्ते मार्गाचा प्रवास हाच पर्याय असतो.

मुंबई-गोवा महामार्ग हा 14 वर्षे रखडलेला आहे. नागोठणे ते रत्नागिरीदरम्यान अनेक ठेकेदार बदलले. निधी उपलब्ध नसणे, भूमी संपादनाचा तिढा कायम असणे, अशा या ना त्या कारणांनी या महामार्गाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे सहा तासांत घरी जा, हा फॉर्म्युला काही यशस्वी झालेला नाही. प्रचंड वाहतूक कोंडी, रस्त्याची दुरवस्था या कारणांमुळे दक्षिण कोकणात या महामार्गावरून पोहोचण्यासाठी 14 तासांपेक्षा जास्त काळ लागत आहे.

सागरी महामार्गाची परिस्थितीही फारशी चांगली नाही. त्यामुळे रो-रो सेवा हा एक उत्तम पर्याय चाकरमान्यांना मिळणार होता; परंतु जेटीचा अडसर याला आड येत आहे. सध्या जयगडला जी जेटी आहे, त्याची डागडुजी झालेली नाही आणि गाड्या उतरवण्यासाठी बंदरात जो रॅम्प लागतो तो दिघी, दाभोळ, जयगड, रत्नागिरी, विजयदुर्ग आणि मालवण येथे कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे ही रो-रो सेवा सुरू करायची झाली, तर थेट मुंबई ते गोवा अशीच होऊ शकते. हाही पर्याय चाकरमान्यांना चालणारा आहे. कारण, गोवा ते सिंधुदुर्ग अंतर 100 ते 120 कि.मी. आहे. त्यामुळे 500 कि.मी.च्या खड्डेमय प्रवासापेक्षा 100 कि.मी. गाडीने प्रवास चाकरमान्यांना शक्य आहे; मात्र याबाबतही कोणतीच चाचणी झालेली नसल्याने ऐन गणेश चतुर्थीत हा प्रवास शक्य आहे का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. विमानाचा प्रवास हा एक पर्याय असला, तरी चिपी विमानतळ सध्या सुरू झालेले नाही. त्यामुळे गणेशोत्सवात चाकरमान्यांची कोंडी होण्याचा संभव अधिक आहे.

कोकणसाठी ग्रीन फिल्ड महामार्ग, सागरी महामार्ग, चिपी विमान प्रवास असे अनेक पर्याय सांगितले गेले असले, तरी एकही परिपूर्ण पर्याय उपलब्ध नाही. गोव्याचा रो-रो सेवेचा पर्याय जो विचाराधीन आहे, तेथेही मेरिटाईम बोर्डाच्या जेटीचे प्रस्तावाचे काम पूर्ण झालेले नाही. पणजीला जी फेरीबोटीची जेटी उपलब्ध आहे, त्यावर रो -रो कितपत उभी राहू शकते, हे चाचणीनंतरच समजू शकते. त्यामुळे रो-रोची बोट उपलब्ध असली, तरी जेटी नसल्याने ‘चणे आहेत पण दात नाहीत’ अशी अवस्था या रो-रो सेवेची आहे. कोकणच्या विकासाच्या गप्पा करत असताना त्याद़ृष्टीने निश्चित असे पाऊल टाकले जात असल्याचे सध्या तरी दिसत नाही. कोकणात अनेक समस्या आहेत, ज्यांचे निराकरण होण्याची गरज आहे. त्यातील एक म्हणजे, वाहतूक व्यवस्था होय. रो-रो सेवेकडे सरकारने गांभीर्याने बघावे, हीच अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news