Konkan Tourist
विजयदुर्ग : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या चाकरमान्यांचा वार्षिक प्रवास हा केवळ एक प्रवास नसतो, तर ती एक भावना असते, एक परंपरा असते. यंदा हीच भावना अरबी समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन एका नव्या युगाची सुरुवात करणार आहे. तब्बल सात दशकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावरून थेट कोकणच्या ऐतिहासिक विजयदुर्ग बंदरात बोटीने दाखल होण्याचे चाकरमान्यांचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत आहे. राज्याचे बंदर विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे सुपुत्र नितेश राणे यांच्या दूरद़ृष्टी आणि अथक प्रयत्नांमुळे ही सागरी रो-रो सेवा गणेशोत्सवापूर्वी सुरू होत असून, यामुळे मुंबई ते सिंधुदुर्ग हा प्रवास अवघ्या साडेचार तासांत शक्य होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी विजयदुर्ग बंदरात जेटी उभारण्याचे काम अक्षरशः युद्धपातळीवर सुरू आहे.
सुमारे 70-75 वर्षांपूर्वी मुंबईहून कोकणात येण्यासाठी बोटीचा प्रवास हाच प्रमुख मार्ग होता. देवगड आणि मालवणच्या बंदरांवर उतरणारी चाकरमान्यांची गर्दी आणि तो उत्साह जुन्या पिढीच्या मनात आजही ताजा आहे. मात्र, काळाच्या ओघात ही सेवा बंद पडली आणि चाकरमान्यांना एसटी, रेल्वे आणि खासगी गाड्यांच्या खडतर प्रवासाला सामोरे जावे लागले. आता मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने ही सागरी परंपरा केवळ पुनरुज्जीवित होत नाहीये, तर तिला आधुनिकतेची जोड मिळत आहे. त्यांनी गणेश चतुर्थीपूर्वी ही सेवा सुरू करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र झटत आहेत.थोडक्यात, यंदाचा गणेशोत्सव हा चाकरमान्यांसाठी केवळ एक सण न राहता, एका नव्या, आरामदायी आणि जलद प्रवासाचा शुभारंभ ठरणार आहे.
सिंधुदुर्गात या अत्याधुनिक सेवेसाठी ऐतिहासिक विजयदुर्ग बंदराची निवड करण्यात आली आहे. चाकरमान्यांना आणि त्यांच्या गाड्यांना घेऊन येणारी बोट सुरक्षितपणे जेटीला लागावी, तसेच प्रवासी आणि वाहनांना सुलभतेने उतरता यावे, यासाठी सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केली जात आहे. जेटी उभारण्यासाठी आवश्यक असणारी अवजड यंत्रसामग्री आणि साहित्य नियोजित स्थळी दाखल झाले असून, लवकरच ’पायलिंग’चा पहिला टप्पा पूर्णत्वास जाईल. बंदर खात्याने या जेटीच्या कामासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामात कोणताही अडथळा येऊ नये आणि ते वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी मंत्री नितेश राणे स्वतः दररोज कामाचा आढावा घेत आहेत.
मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी श्री. देवरा यांनी या सेवेबद्दल अधिक माहिती दिली. ते म्हणाले, मुंबईतील भाऊच्या धक्क्यावरून दोन अत्याधुनिक बोटी या सेवेसाठी सज्ज आहेत. रत्नागिरीसाठीची बोट तीन तासांत, तर सिंधुदुर्गसाठीची बोट साडेचार तासांत पोहोचेल. प्रत्येक बोटीची क्षमता 620 प्रवासी आणि 60 चारचाकी वाहने इतकी आहे. या सेवेसाठी संबंधित कंपनीने दोन नव्या बोटी खरेदी केल्या आहेत. या प्रवासाचे दर अद्याप निश्चित झाले नसले तरी ते लवकरच जाहीर केले जातील. हा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर कोकणातील अन्य तालुक्यांमध्येही जेटी उभारून सेवेचा विस्तार करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.
रस्ते आणि रेल्वेवरील ताण कमी
पर्यटन वाढीस चालना
स्थानिक अर्थव्यवस्थेला गती
वेळेची आणि इंधनाची बचत