कणकवली : हरकुळ बुद्रुक येथील निवृत्त लिपीक रामचंद्र वर्देकर यांना त्यांच्या फोनवर सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून मनी लॉन्ड्रिंगच्या खोट्या गुन्ह्याची भीती दाखवून सुमारे 12 लाख रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सिंधुदुर्ग सायबर क्राईम पोलिसांनी तपास करत सिध्दार्थकुमार गुप्ता ( रा. उत्तर प्रदेश) याला अटक केली.याप्रकरणी आणखीही काही संशयित निष्पन्न होणार असल्याचे सांगण्यात आले.
ही घटना 19 ते 28 नोव्हेंबर दरम्यान घडली होती. रामचंद्र वर्देकर हे घरी असताना 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.33 वाजता त्यांना एका अनोळखी परदेशी क्रमांकावरून फोन आला. बोलणार्या महिलेने त्यांच्या नावाने दुसर्या एका नंबरवरून अश्लील मेसेज जात असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले. या महिलेने लगेचच कॉल सीबीआय अधिकार्यांशी कॉन्फरन्स केला. त्या अधिकार्याने वर्देकर यांचे नाव एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात असून त्यांच्या कॅनडा बँकेतील खात्यात सुमारे दोन कोटी रुपये जमा झाले आहेत, असा खोटा दावा केला.
आरोपींनी अटक करण्याची धमकी दिल्याने वर्देकर हे अत्यंत घाबरले, आणि त्यांनी गुन्हेगारांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करण्यास सुरुवात केली. या बनावट अधिकार्याने व्हॉट्सअॅपवर वारंवार व्हॉईस आणि व्हीडिओ कॉल केले. या सर्व गोष्टी गुपित ठेवा, नाहीतर तुम्हाला कस्टडीमध्ये घ्यावे लागेल, अशी धमकी देत त्यांची भीती वाढवली गुन्ह्यातून नाव काढण्यासाठी पैशांची तपासणी करावी लागेल, असे सांगून त्यांना त्यांच्या सर्व फिक्स डिपॉझिट्स विड्रॉल करून बँक ऑफ इंडियाच्या खात्यात रक्कम जमा करण्यास सांगितले.
त्यांच्या सांगण्यानुसार, 23 ते 27 नोव्हेंबर या काळात घाबरलेल्या वर्देकर यांनी सिधुदुर्ग बँक, पोस्ट खाते, अर्बन निधी आणि शिक्षक बँक ओरोस येथील आपल्या सर्व एफडी मोडून सुमारे 19 लाख रुपये विड्रॉल केले. 25 नोव्हेंबर रोजी रामचंद्र वर्देकर यांनी आरोपींनी दिलेल्या देवदर्शन मायक्रो सर्विसिस फाऊंडेशन (यस बँक, गोरखपूर) नावाच्या एका बँक खात्यावर 12 लाख 64 हजार रुपये आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर केले.
त्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी आणखी 5 लाख 30 हजार रुपये ट्रान्सफर करण्याच्या प्रयत्नात असताना, त्यांचे मुंबईत असलेले सुपुत्र रोहित वर्देकर यांनी वेळीच फोन करून त्यांना थांबविले. मुलाने घरी येऊन संपूर्ण हकीकत ऐकल्यावर आपली फसवणूक झाल्याचे वर्देकर यांच्या लक्षात आले. रामचंद्र वर्देकर यांनी अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानूसार 30 नोव्हेंबर रोजी कणकवली पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला होता. सायबर क्राईम पोलिस पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे गुन्हेगाराचा माग काढत सिध्दार्थकुमार गुप्ता याला अटक केली. त्याचे अन्य काही साथीदारही पोलिसांच्या रडावर आहेत असल्याचे सांगण्यात आले.