सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात चिरेखाणीसाठी प्रसिद्ध एका गावात परप्रांतीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणातील दोघेही संशयित परप्रांतीय असून घटनेची कुणकुण लागताच ते फरार झाले आहेत.
संबंधित अल्पवयीन मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले असताना ही घटना घडली. घरात कोणी नसल्याची संधी साधून 25 आणि 27 वर्षांच्या या दोन्ही नराधमांनी मुलीवर आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर तिला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तेथून पसार झाले. या धक्कादायक प्रकाराने घाबरलेल्या मुलीने आई-वडील घरी आल्यानंतर ही माहिती दिली. मात्र, त्यापूर्वीच संशयित फरार झाले. संशयित दोघेही परप्रांतीय असल्याचे समजते.
फरार संशयितांना चिरेखाण मालकांनी पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या माहितीनंतर सावंतवाडी पोलिसांनी तत्काळ हालचाल केली आहे. सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, घडलेली घटना खरी आहे. आम्ही तपास करत आहोत आणि संशयितांचा कसून शोध घेत आहोत. त्यांचे लोकेशन ट्रेस केले जात आहे. दरम्यान, चौकशीसाठी पोलिसांनी संबंधित चिरेखाण मालकांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र, या प्रकरणाची पोलिसांत अद्याप अधिकृत नोंद (गुन्हा) करण्यात आलेली नाही. पोलिस संशयितांच्या शोधावर आणि चिरेखाण मालकांच्या चौकशीवर अधिक भर देत आहेत.