सिंधुदुर्ग : गटारीच्या नावाने ओळखली जाणारी आषाढी दीप अमावस्या गुरुवारी आहे. गटारी अमावस्या झाल्यानंतर सुरू होणार्या श्रावण महिन्यात अनेकजण मासांहार वर्ज्य करतात. त्यामुळे बुधवारी जिल्ह्यात ‘गटारी’ साजरी झाली. मांसाहारप्रेमींनी सकाळपासून मटण, चिकनच्या तसेच मच्छी मार्केटमध्ये गर्दी केली होती. यावर्षी गटारीवर दारूच्या दरवाढीचे सावट पाहायला मिळाले आहे.
श्रावण महिना शुक्रवारपासून सुरू होत आहे. श्रावण महिन्यात अनेक कुटुंबांमध्ये मासांहार वर्ज्य केला जातो. या पार्श्वभूमीवर अमावस्येच्या अगोदर गटारीच्या नावाखाली घरोघरी मासांहारच्या पार्ट्या केल्या जातात. हॉटेल तसेच निसर्गरम्य ठिकाणाचा शोध घेऊन पार्ट्या केल्या जातात. गटारीसाठी दरवर्षी शेकडो कोंबड्या व बोकडांचा फडशा पाडला जातो. तसेच मच्छीवरही अनेक जण ताव मारतात. अनेकांनी रविवारी ही गटारी साजरी केली; परंतु गुरुवार हा मांसाहारास वर्ज्य वार असल्याने बहुसंख्य जणांनी बुधवारी गटारीचे नियोजन केले होते. यामुळे जिल्हाभरात गावागावातील मटण व चिकन दुकानांच्या बुधवारी सकाळपासूनच गर्दी दिसत होती. होत्या मच्छिमार्केट मधूनही गर्दी पहायला मिळाली.
या गटारीला मात्र दारु दर वाढीचा थोड्याफार प्रमाणात फटका बसला आहे. शासनाच्यावतीने महसुल वाढविण्यासाठी दारु विक्री करात वाढ करण्यात येत असल्यामुळे सध्या देशी दारुपासून विदेशी ब्रँडपर्यंत सर्व प्रकारच्या दारुचे दर भडकले आहेत. अनेकांनी तर बारमध्ये जाणे बंद केले आहे. तर अनेकजण वाईन शॉपमध्ये दारु घेऊन ती मोकळ्या जागेत ती पिताना दिसत आहेत. असे असले तरी यावर्षी गटारीवर दारु दर वाढीचे सावट होते. गटारीला दरवर्षी मोठ्या प्रमाणात दारु विक्री होते. मात्र यावर्षी हे प्रमाण फारच कमी आले आहे. 50 टक्केपण दारु विक्री केली नाही असे एका बार मालकाने सांगितले.