मटका हे व्यसन... कंगाल करणारे! (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Matka Addiction | मटका हे व्यसन... कंगाल करणारे!

मटका हा असा एक जुगार आहे की त्याचे व्यसन अनेकांना लागले आहे. कारण हा पैशाशी संबंधित असलेला धंदा असून तो नियमितपणे केला जातो.

पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : मटका हा असा एक जुगार आहे की त्याचे व्यसन अनेकांना लागले आहे. कारण हा पैशाशी संबंधित असलेला धंदा असून तो नियमितपणे केला जातो. त्याचे वेळापत्रक ठरलेले आहे. या व्यसनाधीन झालेल्या लोक हे शेवटी आर्थिक कंगाल बनतात हे निश्चित आहे. तरीदेखील या व्यवसायावर अनेकजण पोट भरतात अशी एक चुकीची अफवा पसरवली जाते. फक्त मटका घेणारा आणि मटका बुकी यांचाच फायदा होतो, मात्र मटका लावणारे हजारो लोक आर्थिक संकटात येतात, असे या धंद्याचे गणित सांगते.

मटका लावणारे जे लोक आहेत ते आळशी आणि बिनकष्टाचा पैसा कमावण्याच्या मनोवृत्तीचे असतात. काहीही काम न करता दिवसभर मटका लावून आपला दिवस हे लोक घालवतात. कधीतरी काही रक्कम अशा लोकांना मिळतेसुद्धा, मात्र वर्षाकाठी जितका पैसा घालवलेला असतो त्यापेक्षा कितीतरी कमी पैसा एखाददुसर्‍यावेळी मिळतो. ज्या दिवशी हा पैसा मिळतो त्या दिवशी दिवाळी आणि ज्या दिवशी मटका लागत नाही त्या दिवशी नशिबाला दोष देऊन हे मटका लावणारे लोक दिवस घालवतात.

छोट्या मोठ्या बाजारपेठांमधील टपर्‍यांवर हा मटका घेतला जातो. अनेक टपर्‍यांची अवस्था पाहता या टपर्‍या केवळ मटका लावण्यासाठीच उभारलेल्या दिसतात. एक-दोन चॉकलेटच्या बरण्या इतकंच त्या स्टॉलवर दिसतं. अर्थात मटक्याबरोबर गुटखाही अशा टपर्‍यांवर विकला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई आणि कल्याण हे दोन मटका बाजार आहेत. कल्याण हा बाजार दुपारी उघडतो तर मुंबई हा रात्री. विशेष म्हणजे मुंबई बाजाराचा क्लोज आकडा रात्री 12.30 वा. समजतो. तोपर्यंत हे मटका लावणारे लोक जागे राहतात. दिवस कधी उजाडतो आणि आपण बाजारपेठ गाठतो अशी यांची मानसिक स्थिती बनते. सोमवार ते शुक्रवार दररोज हा बाजार सुरू असल्यामुळे हे लोक न चुकता कामधंदे सोडून केवळ मटक्यासाठी बाजारात जातात.

शेकडो लोकांनी जी रक्कम मटक्यासाठी लावलेली असते ती सगळी रक्कम मटका बुकीकडे जमा केली जाते. आकडेही जमा केले जातात. अशी माहिती मिळाली आहे की, ज्या आकड्यावर जास्त पैसे लावले जातात तो आकडा मुंबईकडे कळविला जातो. हजारो बुकींकडून येणारे हे आकडे विचारात घेतल्यानंतर हे आकडे जाहीर होतात. जेणेकरून बुकींना जास्तीतजास्त पैसे मिळावेत अशी त्या मागणी स्ट्रॅटेजी आहे. मटक्याचा आकडा लावल्यानंतर जी रक्कम मटका लावणार्‍याकडून टपरीवर दिली जाते, त्यातील काही टक्के कमीशन टपरीवाला आपल्याकडे ठेवून तो मुख्य बुकीकडे पाठवितो. मुख्य बुकी त्यातील काही टक्के आपल्याकडे ठेवून ती रक्कम मुंबईकळे कळवितो. अर्थात जर मटका लावणारे शंभरजण असतील तर त्यातील केवळ हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच लोकांना हा आकडा लागतो.

ओपन, क्लोज, ब्रॅकेट, तीन पत्ती, जॅकपॉट असे आकडे लागले की त्यानुसार परत मिळणारे पैसे वाढत जातात. परंतु ते फार कमी लोकांना लागतात. ज्या लोकांना लागतात त्या लोकांना त्यातील काही टक्के रक्कम वजा करून दिली जाते. त्यामुळे बुकींचा दोन्ही मार्गाने फायदा असतो. बुकींना जो फायदा मिळतो तो मटका लावणार्‍या शेकडो लोकांच्या पैशातील काही हिस्सा एकत्र करून त्याला दिला जातो. काही लोकांना आकडा लागतो, ज्यांना लागत नाही त्यांचे पैसे फुकट जातात. पूर्ण वर्षाचा हिशोब एखादा मटका लावणारा करतो तेव्हा त्याचे आर्थिक नुकसानच झालेले असते. एका बाजुला कामधंदा नाही आणि दुसर्‍या बाजूला कर्ज काढून, उसणे घेऊन, कुटुंबियांकडून जबरदस्तीने घेवून मटक्यावर पैसे लावले जातात, त्यामुळे हे लोक शेवटी आर्थिक कंगाल बनतात.

आता व्हॉटस्अ‍ॅपवर मटका लावला जातो. पूर्वी कोणता आकडा लागला हे मोटारसायकलवरून फिरणार्‍या एजंटकडून कळायचे. आता गुगलवर सट्टा मटका नावाच्या साईटवर गेल्यावर लागलेला आकडा लगेच कळतो. त्यामुळे कोणता आकडा लागला हे वेळेत कळत असल्यामुळे या धंद्यातील गती वाढली आहे आणि उलाढालही वाढली आहे. मटका लावणे हे आर्थिकद़ृष्ट्या परवडणारे नाही याची कल्पना असतानाही अनेकजण केवळ व्यसन म्हणून हा आकडा लावतात. त्यात पुन्हा काही लोक पूर्ण दिवसभर कोणता आकडा येणार याचा अंदाज बांधण्यासाठी मोबाईलमध्ये डोके घालून बसतात. काही जण तर कागद आणि पेन घेवून दिवसभर आकडेमोड करताना दिसतात. यात या लोकांच्या कुटुंबियांची अवस्था बिकट बनते. अगदी काही मोजके लोक पैसे कमवतात, स्वत:चे घर भरतात मात्र अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त करतात. हेच या मटका जुगार धंद्याचे अंतिम सत्य असल्याचे अनेक माहितगारांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT