Mango-Cashew in Sindhudurg pudhari photo
सिंधुदुर्ग

Mango Cashew farmers protest Mumbai |आंबा-काजू बागायतदारांचा शुक्रवारी मुंबईत मोर्चा

गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगलापर्यंत मोर्चाचे आयोजन; कोकणातील चाकरमान्यांनाही सहभागी होण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

देवगड : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १५ मे रोजी मुंबई येथे आंबा-काजू बागायतदारांचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगला असा हा मोर्चा निघणार असून, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हा लढा उभारण्यात आल्याची माहिती आंबा बागायतदार व व्यापारी संघ, देवगडचे अध्यक्ष काका ढोके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

या मोर्चाला विविध शेतकरी संघटना, सामाजिक संस्था तसेच विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा लाभला आहे. शेतकरी प्रश्नांसाठी एकत्र आलेल्या सर्व संघटना, संस्था आणि पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आंबा आणि काजू ही फक्त पिके नसून कोकणाच्या अर्थकारणाचा आणि ओळखीचा महत्त्वाचा भाग आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सततच्या नैसर्गिक आपत्ती, वाढते उत्पादन खर्च, बाजारपेठेतील अस्थिरता आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबईत वास्तव्यास असलेल्या कोकणातील चाकरमान्यांनाही या मोर्चात सहभागी होण्याचे भावनिक आवाहन करण्यात आले आहे. 'कोकणातील शेतकरी कधी आत्महत्या करत नाही,' असे अभिमानाने सांगितले जाते. मात्र आजची परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की, कोकणातील शेतकऱ्यांवर आत्महत्येसारखी टोकाची वेळ येऊ लागली असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी मुंबईतील चाकरमान्यांनी एक दिवस वेळ काढून या मोर्चात सहभागी व्हावे व शेतकऱ्यांच्या लढ्याला ताकद द्यावी, अशी विनंती आयोजकांनी केली आहे. आंबा-काजू बागायतदारांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन काका ढोके यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT