कुडाळ : आपल्या मयत भावाचे खाण व खनिज अधिनियम कलम 21 मधील जप्त डंपर या वाहनाचा मालक आपणच असल्याचे भासवून तसे खोटे शपथपत्र तयार करून वाहनाचा ताबा घेण्यासाठी दंडाधिकारी कुडाळ वर्ग एक यांच्या न्यायालयात मृत भावाची खोटी स्वाक्षरी करत न्यायालयाचे आदेश प्राप्त केले. या बनावट कागदपत्रांद्वारे वाहन ताब्यात घेऊन न्यायालयाची फसवणूक केली. या प्रकरणी रूपेश रमेश सावंत (वय 34, रा. तळवडे, बादेवाडी, ता. सावंतवाडी) याच्यावर कुडाळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 7 ते 13 मार्च 2025 या कालावधीत घडली.
या घटनेची फिर्याद कुडाळ पोलिसांत कुडाळ सहाय्यक पोलीस फौजदार जनार्दन तुकाराम झारापकर यांनी दिली आहे. यानुसार यातील रूपेश सावंत याने कुडाळ पोलीस ठाणे येथे बीएनएस 2023 चे कलम 303 (2), खाण व खनिज अधिनियम कलम 21 नुसार डंपर क्रमांक चक 07 उ 5577 वर 25 फेब्रुवारी 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये हा डंपर जप्त करण्यात आला होता. या डंपरचा मालक असलेल्या ईसमाचा आधीच मृत्यू झाला होता; मात्र यानंतर या डपरचा मालक आपणच असल्याचे भासवत मयत डंपर मालक याचा भाऊ रूपेश सावंत याने तसे खोटे शपथ पत्र तयार केले व या वाहनाचा ताबा मिळण्यासाठी दंडाधिकारी वर्ग 1 कुडाळ यांच्या न्यायालयात फौ. की अर्ज क्रमांक 14,2025 हा अर्ज 7 मार्च 2025 अन्वये दाखल केला.
मयत भाऊ प्रवीण रमेश सावंत याची बनावट स्वाक्षरी केली. या आधारे न्यायालयाचे आदेशही प्राप्त केले व आदेशानुसार या वाहनाचा मालक आपण स्वतः असल्याचे भासवले व तशी बनावट कागदपत्रे सादर करून नमुद वाहन ताब्यातही घेतले न्यायालयाची व फसवणूक केली. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास येताच शासनाच्या वतीने कुडाळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस फौजदार जनार्दन तुकाराम झारापकर यांनी कुडाळ पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. यानुसार भारतीय न्याय संहिता 227,233,234,236,237,242, 244,246,319(2),318(4),336(2),338,340(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास कुडाळ पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक श्रीम.आडकुर या करत आहेत. अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.
याप्रकरणी संशयित आरोपी रूपेश रमेश सावंत याला अटक करून कुडाळ न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.