Rajkot Killa Chhatrapati Shivaji Maharaj Statue
सिंधुदुर्ग : मालवणमधील राजकोट येथे नव्याने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. नव्या पुतळ्याने अनावरण न करता पूजन करून दर्शनासाठी सर्वांसाठी खुला करण्यात आला. 26 ऑगस्ट 2024 रोजी हा पुतळा कोसळला होता. विक्रमी वेळेत हा पुतळा उभा करण्यात आला असून यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आजी- माजी मंत्री आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसेच शिल्पकार राम सुतार यांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.
राजकोट किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. मराठा नौदल आणि शिवरायांच्या सागरी संरक्षण- सुरक्षेच्या वारशाचा गौरव हा या मागचा हेतू होता. 04 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनानिमित्त या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते.
मात्र अवघ्या नऊ महिन्यात हा पुतळा कोसळला होता. देशभरातून या घटनेवर संताप व्यक्त होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेसाठी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली होती. याच ठिकाणी पुन्हा पुतळा साकारण्याचे काम तातडीने केले जाईल, असे आश्वासनही महायुती सरकारने दिले होते. अखेर 9 महिन्यात या पुतळ्याचे काम पूर्ण झाले असून रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आदी नेते उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रियाही दिली. ते म्हणाले, विक्रमी वेळेत हा पुतळा उभा करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन. आजी-माजी मंत्री यांनी वेगवान वेळेत ही प्रक्रिया पूर्ण केली. वादळाचा अभ्यास करून पुतळ्याची रचना करण्यात आली असून 91 फुटांचा हा पुतळा आहे. यातील चबुतरा हा 10 फुटांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा देशातला सर्वात उंच पुतळा आहे. पुढची 100 वर्ष हा पुतळा कोणत्याही प्रकारच्या वातावरणात टिकेल अशी रचना करण्यात आली आहे. पुढील 10 वर्ष पुतळ्याची जबाबदारी पुतळा उभारणाऱ्यांकडेच असेल. आयआयटी मुंबई आणि शिल्पकार राम सुतार यांनी कितीही जोराचं वादळ आलं तरी पुतळ्याला काही होणार नाही याची दक्षता घेतली आहे, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली.
शिल्पकार राम सुतार यांनी साकारले शिल्प
शिवाजी महाराजांचे शिल्प हे राम सुतार यांनी साकारले आहे. तर या पुतळ्याचे काम त्यांचे पूत्र अनिल सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. नोएडातील कंपनीत पुतळा तयार करण्यात आला असून त्यासाठी सुमारे 21. 9 कोटी रुपये ऐवढा खर्च आला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये या पुतळ्याचे काम सुरू करण्यात आले होते.