जावा पर्यटनाच्या गावा... कांदळवन : कोकणातील अनोखे निसर्ग पर्यटन

कांदळवने पर्यटकांची आकर्षणाची केंद्रे बनली
रायगड, ठाणे
सोनगाव निसर्ग पर्यटन स्थळPudhari News Network
Published on
Updated on

रायगड : जयंत धुळप

कांदळवन हा वनस्पतींचा एक विशेष गट आहे. यात झाडे-झुडपे, ताड जातीची झाडे, औषधी वनस्पती, जमिनीलगत वाढणार्‍या प्रजातींच्या झाडांचा समावेश आहे. कांदळवने भरती-ओहोटीवेळी कठीण पर्यावरणीय परिस्थितीशी जुळवून घेतात. आता हीच कांदळवने पर्यटकांची आकर्षणाची केंद्रे बनली आहेत.

कांदळवनांचे असणारे अनन्यसाधारण महत्त्व विचारात घेऊन शासनस्तरावरून त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. आता यास पर्यटनाची जोड देण्यात आली असून, कांदळवन निसर्ग पर्यटन योजना हा उपक्रम गेल्या आठ वर्षांपासून यशस्वीरीत्या सुरू आहे. यातून किनारपट्टीवरील कांदळवनांतील जैवविविधतेचे संवर्धन आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्रातील कांदळवन निसर्ग पर्यटन स्थळे महाराष्ट्र शासनाच्या ‘कांदळवन संरक्षण आणि उपजीविका निर्माण योजना’ अंतर्गत विकसित केली जातात. या योजना कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठानाद्वारे कांदळवन सहव्यवस्थापन समित्यांमर्फत कोकणातील किनारपट्टीच्या जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत.

चार जिल्ह्यांत विविध उपक्रम

‘कांदळवन प्रतिष्ठान’ सध्या निसर्ग पर्यटनाअंतर्गत कोकणातील पालघर जिल्ह्यातील मारंबळपाडा (विरार), रायगड जिल्ह्यातील काळिंजे आणि दिवेआगर, रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले, पावस, नाचणे, सोनगाव, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारामुंबरी, मिठमुंबरी, वेंगुर्ला, निवती आणि आचरा येथे विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यास राज्यातील पर्यटकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

स्थानिकांना विशेष प्रशिक्षण

स्थानिक लोकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आणि क्षमता बांधणी उपक्रम राबवला जातो. स्थानिक लोकांच्या उन्नतीसाठी आणि कांदळवन व सागरी जैवविविधता संवर्धनास प्रोत्साहित करण्यासाठी समुदाय-आधारित संवर्धन कार्यक्रमाचा एक भाग आहे. सुरुवातीच्या तांत्रिक आणि आर्थिक पाठिंब्यानंतर, निसर्ग पर्यटनाच्या या प्रकल्पाचे नियोजन संपूर्णपणे स्थानिक समुदायांद्वारे करण्यात येत आहे.

कसे पाेहोचाल ?

  • कांदळवन पर्यटन केंद्र, काळिंजे, श्रीवर्धन, रायगड

मुंबई- श्रीवर्धन अंतर 190 कि.मी., पुणे-श्रीवर्धन अंतर 159 कि.मी., पुणे-मुंबईतून थेट एसटी बससेवा. श्रीवर्धन येथून काळिंजे येथे जाण्यासाठी एस.टी. बस, रिक्षा उपलब्ध.

  • दिवेआगर, श्रीवर्धन

श्रीवर्धन-दिवेआगर अंतर 18 कि.मी., येथून दिवेआगरला जाण्यासाठी एसटी बससेवा. श्रीवर्धन आणि दिवेआगर येथे निवासासाठी हॉटेल्स, घरगुती निवारे व रिसॉर्ट.

  • मारंबळपाडा, विरार

विरार व पालघर येथे मुंबईतून ट्रेनने पोहोचता येते. तेथून एसटी बससेवा. तसेच रिक्षा व टॅक्सी सेवा उपलब्ध.

  • आंजर्ले, पावस, नाचणे, सोनगाव

रत्नागिरी जिल्ह्यातील ही कांदळवन पर्यटन केंद्रे रत्नागिरीपासून 50 कि.मी. अंतराच्या टप्प्यात आहेत. रत्नागिरी येथे पोहोचण्यास रेल्वे आणि एसटी सेवा उपलब्ध. मुक्कामाकरिता रत्नागिरी व पावस येथे निवारे, हॉटेल्स उपलब्ध.

  • तारामुंबरी, मिठमुंबरी, वेंगुर्ला, निवती, आचरा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पाच केंद्रे पर्यटकांसाठी विकसित केली आहेत. सावंतवाडी (मळगाव) कोकण रेल्वे स्थानकातून या सर्व ठिकाणी पोहोचता येते. मुंबई-वेंगुर्ला थेट एसटी सेवा.

ठाणे, रायगड
कांदळवन निसर्ग पर्यटनPudhari News Network

पर्यटकांसाठीचे मुख्य उपक्रम असे...

  • कांदळवन नौका स्वारी

  • निसर्ग भ्रमंती व पक्षी निरीक्षण

  • कांदळवन फोटोग्राफी

  • कांदळवन भ्रमंती

  • किनारा भ्रमंती, खडकांमधील जैवविविधतेचे निरीक्षण

  • भ्रमंती व नौका स्वारीदरम्यान विविध

  • स्थळांना भेट

  • आसपासच्या ऐतिहासिक स्थळांना भेटी

  • स्थानिक पाककृती आणि पारंपरिक जेवण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news