सिंदुधुर्ग : मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचा चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचल्याची माहिती समोर आली आहे. पुतळ्याच्या डाव्या बाजूला मोठे भगदाड पडले असून त्याठिकाणी जमीन खोलवर खचल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. पुतळा भक्कम असून जमीन खचली आहे. पुतळा नजीकच्या बांधकामाला भगदाड पडल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात येताच तात्काळ हे काम दुरस्त करण्याची कारवाई सुरु झाली आहे. ४ महिन्यांपूवी हा पुतळा उभा करण्यात आला होता. तरीही या कामात हयगय झाली असून या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.
वर्षभरपूर्वी राजकोट येथील शिवपुतळा कोसळल्याची घटना ताजी असतानाच पुतळ्याच्या नजीकचे बांधकामाला भगदाड पडताच पुन्हा एकदा प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे. या घटनेनंतर पुतळ्याचे मुख्य दरवाजा बंद करण्यात आला. पुतळा भक्कम असून नजीकची जमीन खचली आहे. त्यामुळे पहिले बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे निदर्शनास येत आहे.
यापूर्वी नौदलामार्फत २०२३ मध्ये उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर ८ महिन्यातच उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट रोजी कोसळला होता. या दुर्घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती. समुद्रकाठावरील जोरदार वाऱ्यामुळे कोसळला होता. पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट झाले होते. त्यानंतर सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.
यानंतर राज्य सरकारने याठिकाणी 60 फूट उंच पुतळा उभारण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिले आहे. राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीने याआधी गुजरातमधील ‘स्टॅट्यू ऑफ युनिटी’ या सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचे काम पाहिले होते. पुतळा ज्यावर उभा असेल तो 3 मीटर उंचीचा मजबूत असा चौथरा बनविण्यात येणार आहे. निविदेनुसार 100 वर्ष टिकेल असा पुतळा बांधण्याची अट घातली गेली आहे. तर 10 वर्ष पुतळ्याची देखभाल आणि दुरूस्ती करण्याचीही अट घालण्यात आली आहे.