Sand Mining Pudhari
सिंधुदुर्ग

Malvan Sand Mining Raid | वाळू माफियांना चाप! मालवणमध्ये 47 बेकायदा रॅम्प तोडण्याचे प्रशासनाचे धाडसी आदेश

Malvan Sand Mining Raid | महसूल, बंदर विभागांची कालावल खाडीपात्रात संयुक्त कारवाई

पुढारी वृत्तसेवा

मालवण : पुढारी वृत्तसेवा

मालवण-कालावल खाडीपात्रात व किनाऱ्यालगत महसूल विभाग आणि बंदर विभाग पथकाने केलेल्या संयुक्त पाहणीदरम्यान कालावल खाडीतील बंडा बेटानजीक वाळूने भरलेल्या तीन होड्या व शेरे जमिनीतील वाळू साठा जप्त करण्यात आला.

तसेच, रेवंडी स्मशानभूमी, गावकरवाडी, वायांगणी-सडयेवाडी, तेरई, भगवंतगड, तोंडवळी - करंजेवाडी, तोंडवळी-मधलीवाडी येथील वाळू किनाऱ्यावर उतरविण्यासाठी बांधलेले दगडी व लोखंडी रॅम्प तोडण्याच्या सूचना महसूल प्रशासनाने दिल्या.

कालावल खाडीपात्रातील अनधिकृत वाळू उपशाच्या पार्श्वभूमीवर मालवण महसूल विभाग व बंदर विभाग यांच्यामार्फत कालावल खाडीत मंगळवारी संयुक्त पाहणी करण्यात आली. या पाहणीमध्ये रेवंडी जेटी परिसर व त्या समोरील भागात अनधिकृत वाळू उत्खनन होत असल्याचे दिसून आले नाही.

या पथकाला बंडा बेटानजीक वाळूने भरलेल्या तीन होड्या किनाऱ्यावर आढळून आल्या. या होड्यांमध्ये अनुक्रमे ६ ब्रास, २ ब्रास व ५ ब्रास एवढी वाळू होती. तसेच, शेरे जमिनीमध्ये ४ ब्रास वाळू साठा आढळून आला. ही वाळू व होड्या मालवण बंदर निरीक्षक यांनी जप्त करत त्या तोंडवळी पोलिस पाटीलांच्या ताब्यात दिल्या.

एकूण ४७ रॅम्प तोडण्याचे आदेश

तसेच पाहणी दरम्यान आढळलेले रेवंडी स्मशानभूमी, गावकरवाडी येथे २ लोखंडी रॅम्प, वायंगणी-सडयेवाडी येथील ४ दगडी व ४ लोखंडी रॅम्प, तेरई येथील ७ दगडी रॅम्प, भगवंतगड येथील ७ दगडी व ४ लोखंडी रॅम्प, तोंडवळी-करंजेवाडी येथील ४ दगडी रॅम्प, तोंडवळी-मधलीवाडी येथील १५ दगडी रॅम्प दिसून आले. हे सर्व रॅम्प तोडण्याच्या सूचना प्रशासनाकडून संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT