मालवण : खा. नारायण राणे यांचा उपस्थितीत झालेल्या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे, प्रभाकर सावंत, धोंडी चिंदरकर व अन्य मान्यवर उपस्थित.  छाया : उदय बापर्डेकर
सिंधुदुर्ग

Mahayuti unity Malvan : मालवणात महायुतीतील वाद शमला!

भाजप उमेदवारांविरोधात अर्ज भरलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

मालवण : मालवण जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या विरोधात शिवसेनेने ‌‘एबी‌’ फॉर्म दिल्यावरून भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी आक्रमक भूमिका घेत, मालवण तालुका भाजप शिंदे शिवसेनेला दान करणार काय? असा सवाल केला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कणकवली येथे भाजपा नेते खा. नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आ. नीलेश राणे यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यानुसार भाजप उमेदवारांविरोधात अर्ज भरलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा वाद शमला आहे, अशी माहिती भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी दिली.

तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या विरोधात शिवसेनेने एबी फॉर्म दिल्याचे दिसून आल्याने भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. यात तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर अन्याय होत असून आम्ही तो सहन करणार नाही अशी भूमिका घेतली.

या वादाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी कणकवली येथे खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, राजू परुळेकर, संतोष गावकर, देवेंद्र हडकर, दाजी सावजी यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी, उमेदवार उपस्थित होते.

यावेळी भाजप उमेदवारांच्या विरोधात ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत, त्यांना आपले अर्ज मागे घेण्याच्या सूचना दिल्या जातील, असे आश्वासन खा. नारायण राणे यांनी दिले. त्याचबरोबर ज्यांनी अश्या बंडखोरांना ‌‘एबी‌’ फॉर्म दिले त्यांना समज दिली जाईल, असे स्पष्ट केले. यासंदर्भात आ. नीलेश राणे यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा झाली असून महायुतीचा धर्म पाळला जाईल. महायुती संदर्भातील सर्व विषयांची चर्चा आ. नीलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि आपल्यात होईल, असेही श्री. चिंदरकर यांनी सांगितले. एबी फॉर्मवरून जो वाद निर्माण झाला होता तो राणेंच्या मध्यस्थीने अखेर शमला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याठिकाणी आहेत शिवसेनेचे बंडखोर !

मालवण तालुक्यात मसुरे जिल्हा परिषद गट भाजपला देण्यात आला होता. भाजपकडून त्याठिकाणी क्षमा हडकर उमेदवारी आहेत तर त्याचठिकाणी शिंदे शिवसेनेकडून राधिका परब यांनाही ‌‘एबी‌’ फॉर्मसह उमेदवारी अर्ज भरला आहे. श्रीमती परब यांनी याचठिकाणी आणखी एक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांचे दोन्ही अर्ज वैध ठरले आहेत. तर आडवली-मालडी आणि चिंदर पंचायत समिती गण हे भाजपच्या वाट्याला आले आहेत. तेथेही शिंदे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार उभे आहेत. आडवली-मालडीत भाजपकडून सीमा परुळेकर तर शिंदे शिवसेनेकडून मानसी वेंगुर्लेकर व चिंदरमध्ये भाजपकडून दीपक सुर्वे, शिंदे शिवसेनेकडून पंढरीनाथ मसुरकर हे उमेदवार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT