देवगड :
महिलांच्या सुरक्षिततेसाठी उत्तर प्रदेश - राजस्थान राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही कठोर लव्ह जिहाद विरोधी कायदा तत्काळ लागू करावा, अशी मागणी तालुक्यातील विविध संघटनांच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन देवगड तहसीलदार रमेश पवार यांना देण्यात आले. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, हजारो हिंदू मुलींना प्रेमविवाहाच्या बहाण्याने फसविले जात आहे. अल्पवयीन मुलींना सोशल मीडियाद्वारे किंवा ड्रग्सच्या माध्यमातून जाळ्यात ओढले जात आहे.
हिंदू मुलींना प्रेमाच्या खोट्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक, लैगिंक अत्याचार, धर्मांतर, जबरदस्तीने विवाह केले जातात. ‘लव्ह जिहाद’ हे केवळ वैयक्तिक स्तरावरील गुन्हेगारी कृत्य नसून ते एक संघटित, नियोजनबद्ध आणि वैचारिक युद्ध आहे. यामध्ये खोटी ओळख, प्रेमजाळ, विवाह, धर्मांतरण, लैंगिक शोषण, वेश्या व्यवसाय, निघृण हत्या, मानव तस्करी आणि विक्री, मानवी अवयवांची विक्री आणि दहशतवादी कारवायांत सहभाग इथपर्यंत गंभीर गुन्ह्यांचा समावेश होतो. हे विविध माध्यमातून अनेकदा उघड झाले आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात लव्ह जिहादच्या विरोधात मोर्चे काढले गेले आहेत. जर महिला अन् युवती असुरक्षित राहिल्या तर राष्ट्रही असुरक्षित राहील. त्यामुळे शासन, पोलिस आणि समाज या तिघांनी मिळून हिंदू भगिनींच्या रक्षणाचा दृढ संकल्प करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे राज्यात कठोर लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्टचे जिल्हा सचिव जयेश खाडीलकर, रोटरी क्लब ऑफ मँगोसिटीचे खजिनदार दयानंद पाटील, दैवज्ञ समाज महिला तालुकाध्यक्षा दर्शना कुळकर्णी, खजिनदार विद्या मोंडकर, आरे सरपंच ममता कदम, जि. प. माजी सदस्या मनस्वी घारे, आरे माजी सरपंच महेश पाटोळे, नगरसेविका तन्वी चांदोस्कर, भाजपचे देवगड शहर अध्यक्ष वैभव करंगुटकर, सुवर्णकार संघाचे अध्यक्ष महेश घारे, ठाकरे युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे, ग्राहक मंचाचे सचिव मोहन पाटील, देवगड पतंजली योग समितीच्या वंदना खाडीलकर, कुणकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ तेली, हिंदू जनजागृती समितीचे आनंद मोंडकर, प्रभाकर कदम, अशोक करंगुटकर, सनातन संस्थेचे अनंत परुळेकर, कल्पना शाहाकार आदी उपस्थित होते.