(लेखक - सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी, सिंधुदुर्ग)
गणेशमूर्ती विसर्जन हा भावनेचा क्षण आहे. त्यामुळे तो तितक्याच जबाबदारीने साजरा करणे गरजेचे आहे. जलस्रोत स्वच्छ राहावेत, पाण्याला आणि निसर्गाला हानी पोहोचू नये, निर्माल्य पाण्यात न टाकता स्वतंत्रपणे संकलित करावे, याची काळजी घेऊया. आवश्यक त्या ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलावांचा वापर करणे, हा देखील पर्यावरणपूरक पर्याय ठरू शकतो. पर्यावरणपूरक गणेशोत्सव, निर्माल्य संकलन, पुनर्वापर आणि प्लास्टिकमुक्त उत्सवासाठी व्यापक जनजागृती करण्याची दिशा यंदाच्या उपक्रमांमध्येही अधोरेखित करण्यात आली आहे.
ऊर्जेची बचत हा देखील उत्सवाचा एक सुंदर संकल्प होऊ शकतो. सजावटीसाठी दिवसभर अनावश्यक विद्युत रोषणाई ठेवण्याऐवजी गरजेपुरतीच रोषणाई, एलईडी दिव्यांचा वापर, शक्य असल्यास सौरऊर्जेवर आधारित सजावट आणि वेळेचे नियोजन यामुळे उत्सवाचा आनंद कमी होत नाही; उलट जबाबदार उत्सवाची नवी ओळख निर्माण होते. ऊर्जा बचतीचा संदेश देणारा गणेशोत्सव ही पुढच्या पिढीसाठी चांगली शिकवण ठरेल.
उत्सव हा समाजाला जोडण्यासाठी असतो. म्हणून मंडळांच्या कार्यक्रमांमध्ये स्थानिक बचत गट, कारागीर, कलाकार, शेतकरी, लघुउद्योजक आणि स्थानिक उत्पादनांना स्थान देता येईल. गणेशमूर्ती, मखर, सजावट, पूजासाहित्य, पारंपरिक खाद्यपदार्थ, हस्तकला किंवा स्थानिक कलाकृती यांना प्रोत्साहन दिल्यास उत्सवाचा आनंद गावच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लावू शकतो.
महिलांच्या बचत गटांना स्थानिक खाद्यपदार्थ किंवा प्रसादाच्या उपक्रमात सहभागी करून घेता येईल. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देणे म्हणजे आपल्या संस्कृतीला पुढे नेणे होय. अशा स्थानिक सहभागाची दिशाही प्रस्तावित उपक्रमांमध्ये आहे.
आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे उत्सवातील प्रत्येकाचा सहभाग. एखाद्या मंडळाचा उत्सव केवळ काही कार्यकर्त्यांचा न राहता तो संपूर्ण परिसराचा उत्सव व्हावा. ज्येष्ठांसाठी सांस्कृतिक मैफल, महिलांसाठी पारंपरिक खेळ किंवा कौशल्य प्रदर्शन, मुलांसाठी सर्जनशील उपक्रम, तरुणांसाठी क्रीडा व डिजिटल स्पर्धा आणि सर्वांसाठी सामूहिक आरती, भजन किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध उपक्रम उत्सवाला सर्वसमावेशक बनवू शकतात. सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, सुरक्षितता आणि गरजूंसाठी मदत अशा छोट्या उपक्रमांमधून उत्सवाचे सामाजिक रूप अधिक सुंदर करता येईल.
यंदा उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांच्या स्पर्धेतही मोठ्या उत्साहाने सहभागी होऊया. ही स्पर्धा केवळ सजावट किंवा देखाव्याची नसून उत्सव कसा साजरा केला, परंपरा किती जपली, समाजाचा सहभाग किती वाढविला, पर्यावरणाची काळजी किती घेतली आणि उपक्रमांमधून किती सकारात्मक संदेश दिला, याचेही एक सुंदर व्यासपीठ बनू शकते.
आजच्या डिजिटल युगात आपल्या गावचा गणपती जगभर पोहोचविण्याची संधीही प्रत्येकाच्या हातात आहे. यासाठी रील्स, छायाचित्रण आणि डिजिटल उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची कल्पनाही पुढे आली आहे. मात्र डिजिटल उत्साहात प्रत्यक्ष उत्सवाचा आत्मा हरवता कामा नये. मोबाईलच्या कॅमेऱ्याआडून बाप्पाकडे पाहण्यापेक्षा काही क्षण मोबाईल बाजूला ठेवून आरतीत सहभागी होणे, आजी-आजोबांशी गप्पा मारणे, मुलांसोबत प्रसाद वाटणे आणि शेजाऱ्यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेणे, या छोट्या गोष्टीच तर या उत्सवाला खरेपण देतात.
सिंधुदुर्गचा गणेशोत्सव मुळातच माणसांचा उत्सव आहे. लाल मातीच्या अंगणातल्या बाप्पा शहरातल्या उंच इमारतीत राहणाऱ्यालाही आपलासा वाटतो आणि समुद्रकिनाऱ्यालगतच्या छोट्याशा घरात राहणाऱ्यालाही. इथे बाप्पासोबत येते ती माणसांची ऊब, गावात उत्सवाला आलेला कोकणवासी, घरातली लगबग, शेजारच्या काकूंचा प्रसाद, मित्रमंडळींच्या भेटी, रात्रीची भजनाची मैफल, मुलांचे खेळ आणि विसर्जनाच्या वेळी डोळ्यांत दाटणारी भावना, या सगळ्यांनी गणेशोत्सवाची एक स्वतंत्र कोकणी ओळख निर्माण केली आहे.
ही ओळख जपायची आहे. मात्र जतन म्हणजे परंपरेला जशीच्या तशी बंदिस्त ठेवणे नव्हे. परंपरेचा आत्मा कायम ठेवत तिच्यात कालानुरूप चांगल्या गोष्टींची भर घालणे, हीच खरी सांस्कृतिक समृद्धी आहे. म्हणून यंदा बाप्पाचे स्वागत पारंपरिक पद्धतीने करूया. स्थानिक कला जपूया. आपल्या गावच्या कलाकारांना संधी देऊया. मुलांना आपल्या संस्कृतीशी जोडूया. ज्येष्ठांच्या आठवणी जतन करूया.
पर्यावरणाची काळजी घेऊया. पाण्याच्या आणि विजेचे महत्त्व समजून घेऊया. प्लास्टिकला नकार देऊया. निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करूया. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊया. उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होऊया. आणि आपल्या उत्सवातून असा संदेश देऊया की, आनंदासाठी निसर्गाला किंमत मोजावी लागत नाही.