Political Alliance | नेते युतीसाठी, कार्यकर्ते मैत्रीपूर्ण लढतीसाठी आग्रही  File Photo
सिंधुदुर्ग

Political Alliance | नेते युतीसाठी, कार्यकर्ते मैत्रीपूर्ण लढतीसाठी आग्रही

प्रमोद जठार; महायुती होणार की नाही याबाबत दोन दिवसांत निर्णय

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सिंधुदुर्गात महायुती व्हावी, अशी सर्व नेत्यांची इच्छा आहे; परंतु आमचे कार्यकर्ते मात्र मैत्रीपूर्ण लढतीसाठी आग्रही आहेत. जिल्हास्तरावर याबाबत घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा झाली असली तरी याबाबतचा अहवाल प्रदेश भाजपकडे पाठवण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत महायुती होणार की नाही, याबाबत निर्णय होईल. जिल्ह्यातील चारही नगरपालिकांच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या 81 जागांसाठी भाजपच्या 350 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्याची माहिती भाजपचे जिल्हा निवडणूक प्रमुख माजी आ. प्रमोद जठार यांनी दिली.

कणकवलीतील प्रहार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी नगरसेवक शिशीर परुळेकर, बबलू सावंत उपस्थित होते. प्रमोद जठार म्हणाले, सिंधुदुर्गातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षाने आपली निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. गेले दोन दिवस आपण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात दौरा केला. निवडणूक प्रभारी तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे, पक्षाचे संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी व आपण अशा पाच लोकांच्या कोअर टिमने जिल्ह्यातील चार नगरपालिकांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. स. 9 ते रात्री 11 वा. पर्यंत या मुलाखती चालल्या. चारही नगरपालिकांतील 350 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आम्ही घेतल्या. त्यांना निवडणूक का लढवायची आहे?, त्यांचे सामाजिक कार्य काय आहे?, त्यांचा पुढील उद्देश असे अनेक प्रश्न आम्ही त्यांना विचारले. प्रदेशने निर्देशित केल्यानुसार सर्व अहवाल आपण प्रदेश अध्यक्षांकडे सुपुर्द करणार आहे. त्यानंतरच उमेदवारी कोणाला द्यायची याबाबतचा निर्णय प्रदेशकडून होईल. 14 नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल असे प्रमोद जठार यांनी सांगितले.

सिंधुदुर्गात महायुतीबाबत भूमिका स्पष्ट करताना प्रमोद जठार म्हणाले, युती व्हावी, अशी नेत्यांची इच्छा आहे, परंतु ही निवडणूक कार्यकर्त्यांची असल्याने कार्यकर्ते मैत्रीपूर्ण लढतीसाठी आग्रही आहेत. आम्हाला लढण्याची संधी द्या, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. काल युतीबाबत आ. दीपक केसरकर यांनी देखील मंत्री नीतेश राणे व आमच्याशी चर्चा केली. मात्र सन्मानजनक तोडगा होत असेल तरच युती होणार आहे. रत्नागिरीमध्ये मात्र आमच्या घटक पक्षांची भूमिका वेगळी आहे याकडे आमचे संघटनमंत्री शैलेंद्र दळवी यांनी आ. केसरकरांचे लक्ष वेधले आहे. तरीही कार्यकर्त्यांची जी इच्छा आहे, ती प्रदेशकडे पोहोचवणार असून याबाबतचा निर्णय वरीष्ठ स्तरावरच होईल असे प्रमोद जठार यांनी सांगितले.

खा. राणे व आ. चव्हाण यांच्यात मनभेद नाहीत

सिंधुदुर्गात प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण आणि खा. नारायण राणे यांच्यात वाद असल्याचा आरोप माजी खा. विनायक राऊत केला होता. याकडे लक्ष वेधले असता प्रमोद जठार म्हणाले, राऊत हे कळलावे आहेत. खा. राणे, आ. चव्हाण यांच्यात कोणताही वाद नाही. उलट भाजपमध्ये चांगला संवाद आहे. म्हणूनच 350 एवढ्या मोठ्या संख्येने इच्छुक कार्यकर्त्यांनी मुलाखती दिल्याचे प्रमोद जठार यांनी सांगितले. त्यांच्यात तात्त्विक मतभेद असतील; परंतु मनभेद नाहीत, असेही ते म्हणाले.

संदेश पारकर यांची वेळ नेहमीच चुकते!

शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून संदेश पारकर यांचे नाव पुढे येत आहे, याकडे प्रमोद जठार यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, संदेश पारकर यांची वेळ नेहमीच चुकते, आताही ती चुकली आहे. अजूनही त्यांनी चांगली वेळ शोधावी, ही वेळही त्यांच्यासाठी चांगली नाही, असा खोचक टोला श्री.जठार यांनी लगावला, तर राजन तेली हे ज्येष्ठ नेते आहेत ते सर्व पक्ष फिरून आले आहेत. त्यामुळे ते नेमके कोणत्या पक्षात आहेत, याबाबतही कन्फ्युजन आहे, असा टोलाही श्री. जठार यांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT