देवगड : श्रावण महिन्याला प्रारंभ झाल्यामुळे दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिध्द श्री कुणकेश्वर मंदिरात पहिल्याच श्रावण सोमवारी दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी आहे. दरम्यान शिवभक्तांन सुलभतेने दर्शन घेता यावे यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी श्रावणी सोमवार उत्सवास 28 जुलै रोजी पहिल्या श्रावणी सोमवारपासून सुरुवात होत आहे.
28 जुलै त्यानंतर 4, 11 आणि 18 ऑगस्ट अशा चार श्रावणी सोमवारी हा उत्सव पार पडणार आहे. या उत्सवा निमित्त कुणकेश्वर मध्ये येणार्या शिवभक्तांना सुरळीत दर्शन घेता यावे यासाठी दर्शन रांग व्यवस्था, पोलिस बंदोबस्त, पार्किंग आणि वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक श्रावणी सोमवारनिमित्त प्रथम पूजेचा मान प्रतिष्ठित मान्यवरांना देण्यात येतो. यंदा पहिल्या श्रावण सोमवारी पूजेसाठी मालवणचे प्रसिध्द उद्योजक सुरेश नेरूरकर व कुडाळ येथील उद्योजक आनंद शिरवलक यांना हा मान देण्यात आला आहे.
प्रथम पूजेनंतर स.6 वा.पासून भाविकांसाठी दर्शन रांगाना सुरूवात होणार आहे.भाविकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे. राज्य परिवहन मंडळाच्या देवगड आगारामार्फत विशेष बससेवा चालविण्यात येणार असून देवगड, कुणकेश्वर तसेच रत्नागिरी, सावंतवाडी, कणकवली या एसटी स्थानकांमधूनही कुणकेश्वरसाठी थेट बससेवा उपलब्ध राहणार आहेत. दर श्रावणी सोमवारी सकाळी 6 ते रात्री 8 वा. या वेळेत महाराष्ट्रातील सुप्रसिध्द नामांकित भजनी मंडळांकडून भजनांचे सादरीरकरण होणार आहे.
दर्शन व कार्यक्रम नियोजनासाठी देवस्थान ट्रस्टकडून सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. भाविक, भक्त व पर्यटकांनी ट्रस्ट आणि संबंधित यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी केले आहे. श्रावण महिन्यात येणार्या चार श्रावणी सोमवारनिमित्त धार्मिक कार्यक्रमांबरोबरच विविध उपक्रम देवस्थान ट्रस्टच्यावतीने आयोजित करण्यात आले आहेत.