कुडाळ शहरातील अभिमन्यू हॉटेल ते डॉ. आंबेडकर पुतळ्यापर्यंतची मुख्य रस्त्यालगतची साईडपट्टी
कुडाळ हायस्कूल व पडतेवाडी शाळेजवळ विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी गतिरोधक बसवले
कुडाळ : कुडाळ शहरातील मुख्य रस्त्यावरून चालताना होणारी कसरत आता थांबणार आहे. पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य आणि इतर वेळी धुळीचा त्रास देणार्या साईडपट्ट्यांवर अखेर खडी पसरवण्यात आली असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेत केलेल्या सूचनेनुसार हे काम पूर्ण केले.
शहरातील अभिमन्यू हॉटेल ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंतचा मुख्य रस्ता नेहमीच वर्दळीचा असतो. मात्र, या रस्त्याच्या कडेला असलेल्या साईडपट्ट्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. पावसाळ्यात या पट्ट्या चिखलमय होत असल्याने पादचार्यांना चालणेही मुश्कील झाले होते, तर अनेकदा वाहने घसरून लहान-मोठे अपघात घडत होते. या समस्येमुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत होता.
या समस्येचे गांभीर्य ओळखून नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर आणि त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा निर्णय घेतला. नगरपंचायतीच्या सभेत रीतसर ठराव मंजूर करून या कामाला गती देण्यात आली. आता या संपूर्ण साईडपट्टीवर खडी पसरवण्यात आल्याने चिखलाचा त्रास कायमचा दूर झाला आहे. केवळ साईडपट्टीच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
कुडाळ हायस्कूल आणि पडतेवाडी प्राथमिक शाळेजवळील रस्त्यावर अपघाताचा धोका लक्षात घेता, पालक आणि शिक्षकांकडून सातत्याने रंबलर (गतिरोधक) बसवण्याची मागणी होत होती. मात्र, ही बाब खर्चिक असल्याने बांधकाम समितीकडून याला मंजुरी मिळत नव्हती. अखेर, नगराध्यक्षांनी स्वतः लक्ष घालून स्थायी समितीमध्ये या खर्चाला मंजुरी मिळवून दिली आणि दोन्ही शाळांच्या बाहेर रंबलर बसवण्यात आले, अशी माहिती विलास कुडाळकर यांनी दिली.