कुडाळ : कुडाळ तहसीलमधील अधिकारी व कर्मचार्यांना अॅडव्हान्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचा उद्देश सरकारी कामकाजात ‘एआय’च्या वापराविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्याचा प्रभावी उपयोग कसा केला जाऊ शकतो हे शिकवणे हा होता. यावेळी कुडाळ तहसीलचा व्हॉटस्अॅप चॅनल लाँच करण्यात आला.
कुडाळ तहसील कार्यालयात महसूल सप्ताहनिमित्त महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी गुरुवारी ‘एआय’ तंत्रज्ञानावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक श्री. तेली यांनी याबाबत प्रशिक्षण दिले. तहसीलदार वीरसिंग वसावे, नायब तहसीलदार अमरसिंग जाधव, नायब तहसीलदार संजय गवस यांच्यासह महसूल कर्मचारी उपस्थित होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमात श्री. तेली यांनी ‘एआय’च्या मूलभूत संकल्पनांपासून ते त्याच्या वापराचे प्रॅक्टिकल उदाहरणे दिली. प्रशिक्षणामध्ये डेटा एनालिसिस, मशीन लर्निंग, आणि बॉटस् यांचा समावेश होता.
यामुळे सरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना कामकाजातील प्रक्रियांना अधिक कार्यक्षमतेने पार पाडण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. प्रशिक्षणानंतर संबंधितांनी प्रश्न विचारले आणि चर्चा केली.
अमरसिंह जाधव म्हणाले, कुडाळ तहसीलमध्ये व्हॉटस्अॅप चॅनल लाँच करण्यात आले आहे, यामागे उद्देश म्हणजे तहसील कार्यालयातील सेवांचा भरपूर प्रचार करणे. ग्रामपंचायतीने देखील यासंदर्भात प्रचार व प्रसिद्धी करण्याची अपेक्षा व्यक्त केली. मंडळ अधिकारी श्री. गंगावणे यांनी आभार मानले.
आपण वेगळ्या युगात प्रवेश केला आहे. ‘एआय’चा वापर न करणार्या व्यक्तींना आता स्पर्धेत टिकणे कठीण होणार आहे. आपण घेतलेले प्रशिक्षण खूप महत्वाचे आहे. या प्रशिक्षणामुळे कामाची प्रक्रिया जलद होईल. ‘एआय’ वापरणारे अधिकारी कार्यक्षमता वाढवतील. भविष्यामध्ये ‘एआय’ ला पर्याय नाही, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. माझ्याकडे कल्पना आहेत, पण शेवटी सर्वांचे टिमवर्क महत्वाचे आहे.वीरसिंग वसावे, तहसीलदार- कुडाळ