कुडाळ : कणकवली बाजारपेठ मध्ये मटका केंद्रांवर पालकमंत्री नीतेश राणे यांनी स्वतः धडक देत पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले. कणकवलीमधील या कारवाईमुळे कुडाळ व सावंतवाडी मधील मटका धंदेवाईकांनी आपला गाशा गुंडाळला. तसेच अन्य छोटे व्यवसायिकांनी सुद्धा आपले धंदे धडाधड बंद केले.
पालकमंत्री नीतेश राणे यांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताच जिल्ह्यात मटका, जुगार, दारू असे अवैध धंदे चालू देणार नाही, असे प्रशासनाला ठणकावून सांगितले होते, त्यांच्या इशारा नंतर सुरुवातीला जिल्ह्यातील अवैध धंदे बंद झाले होते, मात्र जिल्ह्यात पुन्हा अवैध धंदयाचा सुळसुळाट सुरू झाला होता. त्यामुळे या अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी मंत्री नीतेश राणे प्रयत्नात होते, स्वतःच्या कणकवली मतदारसंघात मटक्याचा मोठा व्यवसाय चालत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती, त्यानुसार गुरुवारी सायंकाळी 4 वा. कणकवली बाजारपेठेततील मटका केंद्रावर स्वतः ना. राणेंनी धाड टाकली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारचा अवैद्य व्यवसाय चालू देणार नाही, तुम्ही जिल्ह्याचे भविष्य नासवत आहात, तरुण पिढीला तुम्ही काय देणार? असा सवाल करत मटका केंद्र चालकाला चांगले धारेवर धरले.
मंत्री नीतेश राणे यांच्या या धाडीची माहिती वार्यासारखे जिल्हाभर पसरली, त्याचा धसका घेत कुडाळ व सावंतवाडी मधील प्रमुख मटका केंद्र चालकांनी आपला गाशा गुंडाळला. या केंद्रांवर तालुक्यातील ग्रामीण भागातील छोट्या छोट्या टपर्यावरून मटक्याचे कलेक्शन सुरू होत असे, ही सर्व साखळी धडाधड बंद झाली. शहरांमधील टप्प्यांवर घेण्यात येणारे आकडे बंद करण्यात आले. एकूणच मंत्री राणे यांच्या या धडक कारवाईमुळे मटका केंद्र चालक धास्तावले आहेत, दुसरीकडे अवैद्य धंदेवाल्यांची झोप उडाली आहे. पोलिस यंत्रणा आता या अवैद्य धंदेवाल्यांवर कोणती कारवाई करतात, हे पाहणे औत्सुुख्याचे आहे.