कुडाळ : पावशी - घावनळे - आंबेरी मार्गावर पावशी-शेलटेवाडी येथे एसटीला बाजू देताना धोकादायक साईडपट्टीवर मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात स्वाराला दुखापत झाली. जखमीला स्थानिक ग्रामस्थांनी कुडाळ रूग्णालयात दाखल केले. ही घटना गुरूवारी स.10 वा.च्या सुमारास घडली. ही धोकादायक साईडपट्टी आणि रस्त्यालगत वाढलेली झाडी याबाबत पावशी ग्रामस्थांनी सा. बां. च्या शाखा अभियंत्यांना भर पावसात घटनास्थळी बोलावून जाब विचारला.
वारंवार मागणी करूनही रस्त्याची साईडपट्टी दुरूस्त केली जात नाही. तसेच झाडी हटविली जात नसून, यामुळे मोठा अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थांनी केला. यावर येत्या दोन दिवसांत साईडपट्टी आणि झाडी कटिंगचे काम करण्यात येईल, असे आश्वासन अभियंत्यांनी दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.
या रस्त्यालगत ठिकठिकाणी झाडी वाढली आहे. तसेच साईडपट्टीही नसल्याने वाहतुकीला धोका निर्माण होतो. काही दिवसांपूर्वीच पावशी-शेलटेवाडी येथे एसटी आणि वॅनगार कार यांच्यात अपघात झाला होता. त्यावेळी साईडपट्टी आणि रस्त्यालगतच्या झाडीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यावेळी या रस्त्यालगतची झाडी तातडीने हटवावी, साईडपट्टी करून देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. गुरूवारी सकाळी शेलटेवाडी वळणावरील पुलाच्या कटोकट पुराचे पाणी वाहत होते. तेथे एसटीला बाजू देताना घावनळे ते कुडाळ येणारी मोटरसायकल रस्त्यावरून घसरली.
यात मोटरसायकलस्वाराला दुखापत झाली. स्थानिक ग्रामस्थानी त्याला तात्काळ कुडाळ ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. साईडपट्टीच्या दुरावस्थेमुळेच हा अपघात झाल्याचा आरोप करत याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना प्रत्यक्ष येऊन पाहणी करण्याची मागणी केली.
यानंतर काही वेळात शाखा अभियंता श्री.मोहिते सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी धोकादायक साईडपट्टी आणि झाडीबाबत आक्रमक भूमिका घेत त्यांना धारेवर धरले. बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे वारंवार या रस्त्यावर अपघात होत आहेत. पावसाच्या पाण्यामुळे शेलटेवाडी कॉजवे धोकादायक बनला. तेथे साईडपट्टी नसल्याने हा अपघात झाल्याचा आरोप करीत तातडीने साईडपट्टी बांधण्यात यावी.
तसेच झाडी हटवून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. त्यावर शाखा अभियंता श्री.मोहिते यांनी दोन दिवसात मुख्य हायवे घावनळे फाटा ते शेलटेवाडी जि.प.शाळेपर्यंत दोन्ही बाजूला दगडाच्या सहाय्याने साईडपट्टी मजबूत केली जाईल. झाडीही हटविण्याची कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. पावशी उपसरपंच लक्ष्मीकांत तेली, माजी सरपंच चंद्रकांत कुंभार, निलेश शेलटे, बाबा तेली, बाळा केसरकर, प्रवीण शेलटे, संदीप शेलटे, पोलिसपाटील अरविंद बिले, राकेश शेलटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.