कुडाळ : भात हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकर्यांचे खरीप हंगामातील प्रमुख भात पीक आहे. मात्र गेल्या काही वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाताच्या पिकाखालील जमीन पडीक होण्याचे प्रमाण वाढले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रासाठी ही धोक्याची घंटी आहे. जिल्ह्यात एकूण लागवडीखालील क्षेत्र 2 लाख 15 हजार हेक्टर आहे. हंगामी शेती योग्य जवळपास 72 हजार हेक्टर क्षेत्र आहे; त्यामध्ये जवळपास 55 हजार हेक्टर क्षेत्रावरच भात पिकाची लागवड होते, उर्वरित क्षेत्र पडीक दिसत आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यात बागायती क्षेत्र वाढल्याचे दिलासादायक चित्र आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 2 लाख 3 हजार 950 हेक्टर आहे. जिल्ह्यात जवळपास 72 हजार हेक्टर क्षेत्र हंगामी शेतीयोग्य आहे. पूर्वी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भात लागवड केली जात होती, त्यावेळी घरोघरी व गावागावात मनुष्यबळ मोठया प्रमाणात व सहज उपलब्ध होते. मात्र आधुनिक संपर्क सुविधांमुळे ग्रामीण भागाशी मुंबई-पुणे सारखी मोठी शहरे जोडली गेली, त्यामुळे शिकलेली मुले तालुका, जिल्हा व मोठ्या शहरांकडे रोजगारासाठी वळू लागली. त्यातच गावागावातील जंगलांची तोड झाल्यामुळे वन्य प्राणी थेट शेतात उतरू लागले, त्यांच्याकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले. या पोटी शासनाकडून मिळणार्या नुकसान भरपाईचा उत्पन्नाशी ताळमेळ बसत नाही.
परिणामी अनेक शेतकर्यांनी शेती करणे सोडून दिले. त्यातच कमी होत असलेले मनुष्यबळ, वाढलेले मजुरीचे दर यामुळे शेतीचे गणित जुळत नसल्याने अनेक शेतकर्यांनी शेतीकडे दुर्लक्ष केले. सहाजिकच जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी भात लागवड क्षेत्र कमी होत आहे. दुसरीकडे पडीक क्षेत्र वाढत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. यामध्ये एक आनंदाची बाब म्हणजे भात पिकापेक्षा आंबा, काजू, बांबू लागवडीकडे जिल्ह्यातील शेतकर्यांचा अधिक कल दिसत आहे.
आधुनिक शेतीच्या युगात नवनवीन तंत्रज्ञानाचा सुद्धा शेती क्षेत्रात वापर होताना दिसत आहे. पूर्वी पारंपरिक पद्धतीने बैल जोडीच्या सहायाने शेती केली जात होती. आता नव्याने आलेल्या यांत्रिकीकरणाचा शेतकरी पुरेपूर लाभ घेतला आहे. शेत- शिवारात बैल जोडी हाताच्या बोटावर दिसत आहेत. सर्वत्र ट्रॅक्टरची घरघर ऐकू येत आहे. बहुतांश शेतकर्यांनी कृषी योजनेतून कृषी साहित्य खरेदी केले. दुसरीकडे शासनाकडून रेशनवर तांदूळ व गहू मोफत दिला जातो. शेती क्षेत्र घटण्यामागील हे सुद्धा एक महत्वाचे कारण आहे. अश्या अनेक शेतकर्यांनी शेती करणे सोडून दिले आहे. परिणामी जिल्ह्यातील पडीक क्षेत्रात वाढ होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 5 लाख 3 हजार 950 हेक्टर क्षेत्र आहे, त्यामध्ये एकूण लागवडीखालील क्षेत्र 2 लाख 15 हजार हेक्टरवर (हंगामी पिके 72 हजार हेक्टर तर फळपिके 1 लाख 43 हजार हेक्टर) आहे. कवळकाड क्षेत्र जवळपास 40 हजार हेक्टरवर आहे. खडकाळ व लागवडीस अयोग्य असे 1 लाख 22 हजार हेक्टर क्षेत्र आहे. जंगली क्षेत्र 56 हजार हेक्टरवर विस्तारलेले आहे. एकूणच प्रतिवर्षी लागवडी लायक पड क्षेत्रात वाढ होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याच्या शेती क्षेत्रासाठी ही धोक्याची घंटा आहे.
ग्रामीण भागात पूर्वी डोंगरातील उतार असलेल्या जागेत मोठ्या प्रमाणात नाचणी पीक घेतले जात होते; त्या नाचणी पिकाला मोठ्या प्रमाणात मागणी सुद्धा होत होती, अजूनही आहे, पण आता या डोंगराळ भागात काजू लागवड केली जात आहे. काजू लागवड ही शासनाच्या योजनेत असल्यामुळे शेतकर्यांना त्याचा मोठा फायदा होत आहे. काजू बियांना दर सुद्धा चांगला उपलब्ध होत असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात काजू लागवडीकडे वळत आहेत.
गावाकडून शहरांकडे तरुणांचे स्थलांतर
वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव
रास्त दुकानांवर मिळणारा मुबलक तांदूळ
शेतीपेक्षा बागायतीकडे शेतकर्यांचा कल
जिल्ह्यात यावर्षी सन 2025 च्या खरीप हंगामाकरिता भात लागवडीसाठी 57 हजार 540 हेक्टर क्षेत्राचे लक्षांक देण्यात आले होते; आतापर्यंत केवळ 14 हजार 510 हेक्टर क्षेत्रातच भात लागवड झाली आहे. जुलै अखेरपर्यंत उर्वरित भात लागवड होईल असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाले आहे; त्यामुळे गावातील तरुण शहराकडे स्थलांतरित झाला आहे. परिणामी गावात शेतात राबणारा वर्ग कमी झाला. कृषीमधील नवनवीन प्रयोगामुळे कमी क्षेत्रात अधिक उत्पादन देणारी पिके तयार झाली, रास्त धान्य दुकानावर मोठ्या प्रमाणात धान्य मिळू लागले. या अशा अनेक कारणांमुळे कोकणात भात लागवडीखाली क्षेत्र धान्य संरक्षक औषधे मारून साठवलेला असतो; तो आरोग्यासाठी काहीसा अपायकारक असू शकतो,त्यामुळे शेतकर्यांनी आपल्या शेतातच अधिकाधिक भात पिकाची लागवड करून आपल्या शेतातील विषमुक्त तांदूळ खावा, असे आवाहन उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवी यांनी केले आहेे. सामूहिक शेती आणि यांत्रिकीकरण हबद्वारे शेतीचे पुनरुज्जीवन शक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.