कुडाळ : कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा नजीक असलेल्या डॉन बॉस्को चर्चच्या इमारतीला मंगळवारी सकाळी 6.45 वा. च्या सुमारास भर पावसात अचानक आग लागली. क्षणार्धात आगीचा भडका उडाला आणि हवेत धुराचे लोळ जाऊ लागले. लागलीच स्थानिक नागरिक तसेच कुडाळ न. पं आणि एमआयडीसीच्या अग्निशमन बंबानी घटनास्थळी धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत इमारतीतील दीडशे प्लास्टिक खुर्च्या, वायरिंग, सिंलिंग जळाले. तसेच सिमेंट पत्रे आणि खिडक्या फुटल्या. दोन स्टॅच्यू जळाले. संपूर्ण इमारत धुराने काळी पडली. या घटनेत सुमारे 2 लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांसह नगरसेवक, तहसीलदार, पोलिस निरीक्षक व महसूल अधिकार्यांनी घटनास्थळी पाहणी केली.
डॉन बॉस्को चर्चला आग लागल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. इमारतीच्या प्रवेशद्वारातून मोठ्या प्रमाणात धूर येताना नागरिकांना दिसला. त्यांनी लगेच नगर पंचायत आणि एमआयडीसी अग्निशमन यंत्रणाना कल्पना दिली. इमारतीच्या प्रवेशद्वारावर इलेक्ट्रिक मीटर आहे. त्या मीटर नजीकच असलेल्या प्लॅस्टिकच्या खुर्च्यांना लागल्याने आगीचा भडका उडाला. नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काही वेळातच एमआयडीसी आणि कुडाळ नगर पंचायतीचे बंब घटनास्थळी आले आणि त्यांनी आग विझवली. नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक विलास कुडाळकर, तहसीलदार वीरसिंग वसावे, पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम, मंडळ अधिकारी श्री.मसुरकर, तलाठी श्री.परब यांनी घटनास्थळी पाहणी केली.
आग लागल्याची माहिती मिळताच ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीराम शिरसाट, शिंदे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, संजय भोगटे, सामाजिक कार्यकर्ते समिल जळवी, पप्पू नार्वेकर, नगरपंचायतीचे कर्मचारी, कुडाळ, नेरूर, रानबांबुळी व नेरूर मधील ख्रिश्चन समाज बांधव उपस्थित होते.