DigiLocker Electricity Bill
कुडाळ : आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला अशी महत्त्वाची कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात सुरक्षित ठेऊन हवे तेव्हा उपलब्ध करून देणार्या केंद्र सरकारच्या डिजिलॉकर या ऑनलाईन सुविधेमध्ये आता महावितरणची वीजबिलेही उपलब्ध झाली असून वीज ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले आहे. अशी माहिती महावितरणचे कोकण विभाग जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वीज ग्राहकांना ईज ऑफ लिव्हिंगच्या आधारे अधिकाधिक सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणने केंद्र सरकारच्या डिजिलॉकरशी वीजबिले जोडली आहेत. यामुळे वीज ग्राहकांना आपल्या मोबाईल फोनमध्ये डिजिलॉकर अॅपमध्ये ठेवलेल्या महत्त्वाच्या दाखल्यांसोबतच वीजेची बिलेही उपलब्ध होणार आहेत. त्यांना वीजबिल भरण्यासाठी तसेच गरजेनुसार हे बिल कोणाला पाठविण्यासाठी किंवा त्याचा प्रिंट काढण्यासाठी याचा उपयोग होईल.
डिजिलॉकर हा केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने डिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या अंतर्गत सुरू केलेला महत्त्वाचा उपक्रम आहे. त्याचा वापर करून नागरिकांना आपले पॅन कार्ड, वाहन नोंदणी कागदपत्रे, रेशन कार्ड, दहावी मार्कशीट, बारावी मार्कशीट, निवासाचा दाखला असे अनेक दस्तऐवज अॅपमध्ये सुरक्षित ठेवता येतात आणि गरजेनुसार त्यांचा वापर करता येतो. सर्व दाखले मोबाईल अॅपमध्ये ठेवलेले असल्याने ते सदैव सोबत उपलब्ध राहतात.
देशात आतापर्यंत 52 कोटी 89 लाख नागरिकांनी डिजिलॉकरचा वापर सुरू केला असून त्यांनी त्यात 859 कोटी कागदपत्रे ठेवली आहेत. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या नियमावलीनुसार डिजिलॉकरमधील दस्तऐवज मूळ कागदी प्रत्यक्ष दाखल्याच्या समान समजले जातात व त्याला कायदेशीर दर्जा आहे.
महावितरणने आपल्या संगणकीय व्यवस्थेतील बिलांची माहिती डिजिलॉकर सुविधेला उपलब्ध करून दिली आहे. वीज ग्राहकाने आपल्या डिजिलॉकर अॅपमध्ये गेल्यानंतर महावितरण कंपनीची निवड करून आपला वीज ग्राहक क्रमांक दाखल करण्याची कृती एकदाच करायची आहे. त्यानंतर त्या ग्राहकाला आपल्या डिजिलॉकरमध्ये विजेचे चालू महिन्याचे बिल उपलब्ध होणार आहे अशी माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली आहे.