कुडाळ : कुडाळ नगरपंचायतमध्ये भाजपच्या ‘कमळ’ चिन्हावर निवडून आलेल्या आठ पैकी सहा नगरसेवकांना जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत निलंबित केले आहे,तसे पत्र त्या नगरसेवकांना पाठविले आहे. तसेच जिल्हाधिकारी यांचे सुद्धा लेखी पत्राद्वारे याकडे लक्ष वेधत नगरसेविका संध्या तेरसे व नगरसेवक रामचंद्र ऊर्फ नीलेश परब यांना त्या आठ जणांच्या गटातून वगळण्यात यावे अशी विनंती केली आहे. विशेष म्हणजे या सहाही नगरसेवकांची शिवसेनेच्या कार्यक्रमात उठबस अधिक तर भाजपच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे कारण असल्याचे समजते. भाजपच्या या कडक धोरणामुळे कुडाळमधील महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कुडाळ नगरपंचायतीच्या भाजपच्या आठ पैकी सहा नगरसेवकांच्या निलंबनासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याजवळ पत्र दिले आहे; या पत्रामध्ये त्यांनी म्हटले आहे, भाजप पक्षाच्या ‘कमळ’ निशाणीवर निवडून आलेल्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, संध्या तेरसे, रामचंद्र परब यांचा अधिकृत सिद्धिविनायक नगरविकास आघाडी हा गट स्थापन आहे. मात्र गेल्या काही महिन्यापासून या गटातील नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी हे सहा नगरसेवक पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सहभागी होत नाहीत, त्यांना वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा ते सहकार्य करत नाहीत. भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत बैठका, सभा व कार्यक्रमांना वारंवार अनुपस्थित राहणे, इतर राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर हजर राहणे, पक्षाच्या अधिकृत सदस्यता नोंदणी मोहिमेत सहभागी न होणे आणि सक्रिय सदस्यत्व न घेणे, इतर पक्षाच्या सभासद नोंदणी कार्यक्रमांना हजेरी लावणे, पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात सार्वजनिक विधाने करणे, कुडाळ नगरपंचायत क्षेत्रातील कार्यक्रमांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार बॅनरवर पक्षनेत्यांचे फोटो न लावता, इतर पक्ष नेत्यांचे फोटो प्रदर्शित करणे.
वरील सर्व बाबीं संदर्भात आपणास अनेक वेळा प्रत्यक्ष व दूरध्वनीद्वारे तोंडी समज देण्यात आली असूनही आपण पक्षशिस्त पाळलेली नाही. यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसत असून, पक्षहित बाधित होत आहे.त्यामुळे, भाजपा जिल्हाध्यक्ष या नात्याने, पक्षघटनेतील अधिकारांचा वापर करून, आपणास 11 ऑगस्ट पासून पक्षातील सर्व पदांवरून व प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित करण्यात येत आहे. आपल्या विरोधात पुढील शिस्तभंगात्मक कारवाईसाठी हा निलंबन आदेश तत्काळ प्रभावाने लागू राहील, याची कृपया नोंद घ्यावी. असे पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, याबाबत जिल्हाधिकार्यांना सुद्धा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्र दिले असुन त्यात असे नमूद केले आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष या नात्याने 1 ऑगस्ट 2025 रोजी अनुक्रमांक 1 ते 6 या सहा नगरसेवकांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.अशा परिस्थितीत, अनु.क्र.7 सौ. संध्या प्रसाद तेरसे व अनु क्र.8 रामचंद्र ऊर्फ नीलेश मनोहर परब हे भाजपचे दोन नगरसेवक सदर श्री सिद्धिविनायक नगरविकास आघाडी या गटात राहू इच्छित नाहीत. तशा प्रकारचा स्वतंत्र अर्ज देखील ते आपल्याकडे सादर करत आहेत. तरी अनुक्रमांक सात व आठ या दोन नगरसेवकांना सदर श्री. सिद्धिविनायक नगरविकास आघाडी या गटातून वगळण्यात यावे अशी आपणास विनंती करण्यात येत आहे. त्याबाबत आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करून आदेश निर्गमित करावेत, असे पत्र दिले आहे. भाजप नगरसेवकांच्या या निलंबनामुळे कुडाळात महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कुडाळ नगरपंचायतमधील सत्ताधारी भाजपचे आठ पैकी सहा नगरसेवकांचे भाजप जिल्हाध्यक्षांनी निलंबन केलं आहे; याबाबत आ.नीलेश राणे यांना विचारले असता नगरसेवकांच्या निलंबनाचे अधिकृत जाहीररित्या स्टेटमेंट कुणी दिलं असेल तरच त्याबाबत मी बोलू शकतो; अन्यथा नगरसेवकांच्या निलंबनाबाबत मी बोलण्यास बांधील नाही, असे आ. राणे यांनी सांगून निलंबन प्रश्नाबाबत अधिक बोलणं टाळलं.