सावंतवाडी : देशभरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी सुरू असलेल्या ‘अमृत भारत’ स्थानक योजनेत महाराष्ट्रातील 103 स्थानकांची निवड झाली असली तरी, कोकण रेल्वे मार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही स्थानकाचा त्यात समावेश न झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि रेल्वे मंडळाने कोकणातील प्रवाशांना आणि रेल्वे स्थानकांना या योजनेपासून वंचित ठेवल्याचा आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे. विशेष म्हणजे, कोकण रेल्वे मार्गावरील गोव्यातील आणि कर्नाटकातील प्रत्येकी एका स्थानकाला या योजनेत स्थान मिळाले आहे.
कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. गाड्या अनेकदा वेळेवर धावत नाहीत, त्यातच स्थानकांवर पुरेशा पायाभूत सुविधांचा अभाव आहे. इंदापूर, गोरेगाव रोड, सापे-वामणे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, अंजनी, कामथे, कडवई, निवसर, वेरवली, खारेपाटण रोड यांसारख्या अनेक स्थानकांवर प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्याने आणि मूलभूत सुविधा नसल्याने प्रवाशांना चढ-उतार करताना त्रास होतो. अनेकदा यामुळे अपघातही घडतात. रेल्वेच्या नियमांनुसार प्लॅटफॉर्म आणि पादचारी पूल या अत्यावश्यक सुविधा असूनही, निधीअभावी त्या कोकण रेल्वे मार्गावर उपलब्ध करून देणे शक्य झालेले नाही. दिवाणखवटी स्थानकात तर गेल्या 30 वर्षांपासून प्लॅटफॉर्मच बांधलेला नाही.Konkan
कोकण रेल्वेचे अद्याप भारतीय रेल्वेत विलीनीकरण न झाल्यामुळे या समस्या अधिक गंभीर झाल्या आहेत. सर्वाधिक महसूल मिळवून देणार्या महाराष्ट्रातील स्थानकांना अमृत भारत योजनेत स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या दुजाभावामुळे आता प्रवासी संघटना आक्रमक झाल्या असून, त्यांनी संबंधित लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा सुरू केला आहे.
अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी मागणी केली आहे की, कोकणातील सर्व स्थानकांचा अमृत भारत योजनेत समावेश करावा. तसेच, स्थानकांवर 24 डब्यांची रेल्वे उभी राहू शकेल इतके लांब प्लॅटफॉर्म, संपूर्ण प्लॅटफॉर्मवर छत, पादचारी पूल, छतासह आणि लिफ्ट यांसारख्या सुविधा प्राधान्याने पुरवाव्यात. स्थानकाचे उत्पन्न हा निकष न लावता, अतिवृष्टीचा प्रदेश म्हणून कोकणातील सर्व स्थानकांवर या सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.