सावंतवाडी : मुंबई आणि कोकण दरम्यानचा लांबचा रस्तेप्रवास टाळण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कोकण रेल्वेच्या ‘रो-रो’ (रोल ऑन, रोल ऑफ) सेवेला अधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी आता सावंतवाडी, रत्नागिरी आणि संगमेश्वर या प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. यामुळे प्रवासी आपली वाहने ट्रेनमधून घेऊन कमी वेळेत कोकणात पोहोचू शकतील.
गणेशोत्सव काळात कोकण रेल्वेने ‘कार ऑन ट्रेन’ (रो-रो) सेवा सुरू केली होती. मात्र, फक्त कोलाड, नांदगाव रोड आणि वेर्णा असे तीनच थांबे या सेवेला असल्याने सुरुवातीला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला. विशेषतः रत्नागिरी आणि सावंतवाडीसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी थांबा नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती.
दरम्यान प्रवाशांचा प्रतिसाद वाढवण्यासाठी प्रशासनाने आता या मार्गावर‘रो-रो’ सेवेसाठी तीन नवीन स्थानकांचा समावेश केला आहे. रो-रो ट्रेनमधून वाहने चढवण्यासाठी आणि उतरवण्यासाठी सावंतवाडी, रत्नागिरी आणि संगमेश्वर येथे लवकरच रॅम्प (ठरािी) तयार केले जातील, अशी माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी दिली.
रो-रो ट्रेनमध्ये सध्या 10 वॅगन (वाहनांसाठी) आणि दोन प्रवासी कोच आहेत. या ट्रेनमधून एकावेळी सुमारे 40 कार घेऊन जाता येतात.
दरम्यान, कोकण रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामांसाठी रेल्वे मंत्रालयाकडे 7,700 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. रो-रो सेवेला अधिक प्रभावी बनवून जास्तीत जास्त प्रवाशांना आकर्षित करण्याच्या योजना प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. 15 ऑक्टोबर रोजी कोकण रेल्वेने आपला 35 वा स्थापना दिन साजरा केला.