

मळगाव : सर्वपित्री अमावस्येने पितृपंधरावड्याची सांगता होत असल्याने रविवारी सावंतवाडी मच्छी मार्केटमध्ये मच्छीखवय्याने मासे खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.
गेले पंधरा दिवस पितृपक्ष पंधरवडा सुरू होता. त्याची सांगता रविवारी सर्वपित्री अमावस्येने झाली. सोमवार पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. हिंदू धर्मात पितृपक्षांत पितरांच्या नावाने महालय घालण्याची प्रथा आहे, त्यानुसार महालय घातला जातो. त्याची सांगता सर्वपित्री अमावास्येला होते. सर्वपित्री अमावस्येनंतर घटस्थापना होते. त्यानंतर पुढचे नऊ दिवस नवरात्र उत्सवात विविध धार्मिक विधींचे आयोजन केले जाते. त्यामुळे सर्वपित्री अमावस्येनंतर मांसाहार वर्ज्य केला जातो.
सर्वपित्री अमावस्येला रविवार आला असल्यामुळे आज सावंतवाडी मच्छी मार्केटमध्ये मत्स्यखवय्याने मासे खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. मच्छी मार्केटमध्ये माशांसाठी नागरिकांकडून मागणी वाढल्यामुळे माशांचे दर कडाडलेले दिसले. तरीही मस्त खवय्याने मासे खरेदी करण्यासाठी गर्दी केलेली दिसून आली.