कणकवली : कोकण रेल्वेच्या रो-रो कार परिवहन सेवेसाठी कारच्या बुकिंगसाठी नोंदणीची मुदत 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वा. पर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 13 ऑगस्टपर्यंत जाहीर करण्यात आली होती. या सेवेसाठी कोलाड ते वेर्णा प्रति कार (5 टक्के जीएसटीसह) 7 हजार 875 रुपये तर कोलाड - नांदगाव प्रति कार (5 टक्के जीएसटीसह) 5 हजार 460 रुपये मालवाहतूक शुल्क ठेवण्यात आले आहे.
यामध्ये आगावू नोंदणीसाठी 4 हजार रुपये नोंदणी शुल्क भरावे लागणार असून प्रवासाच्या दिवशी प्रवासाच्या मूळ स्थानकावर उर्वरीत शुल्क भरावे लागणार आहे. प्रत्येक सेवेची वाहून नेण्याची क्षमता 40 कार (प्रति व्हॅगन 2 कार) पर्यंत असणार आहे. 18 ऑगस्टपर्यंत मिळालेले एकूण बुकींग प्रति ट्रिप 16 पेक्षा कमी कार असल्यास सेवा चालविली जाणार नाही आणि नोंदणी शुल्क परत केले जाणार आहे. एकदा रो-रो ट्रेनमध्ये गाड्या चढविल्या की ना ड्रायव्हर, ना कोणी सहप्रवाशी आतमध्ये असणार आहे.
वाहनाच्या आत प्रवास करण्याची परवानगी असणार आहे. गाडीतील प्रवाशांनी रो -रो ट्रेनसोबत जोडलेल्या पॅसेंजर कोचमध्ये (3 एसी आणि 25 सिटींग) विहीत प्रवाशी भाडे भरून प्रवास करायचा आहे. प्रत्येक कार बुकिंगसाठी जास्तीत जास्त 3 प्रवाशांना (3 एसी क्लासमध्ये दोन प्रवाशी आणि 25 क्लासमयध्ये 1 पॅसेंजर) परवानगी असणार आहे. अतिरिक्त प्रवाशी असतील तर जोडलेल्या डब्यांमध्ये रिक्त बर्थ, सीट असतील तरच परवानगी दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी कोलाड-वेर्णा, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक कार्यालय बेलापूर येथे तसेच वेर्णा आणि कणकवली रेल्वेस्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी केले आहे.