कोकण रेल्वे  
सिंधुदुर्ग

Konkan Railway News |कोकण रेल्वेकडून ५ वर्षात प्रवाशांच्या सुविधेसाठी १०५ कोटींची तरतूद

Konkan Railway allocates Rs 105 crore for passenger facilities-कोकण रेल्वेकडून ५ वर्षात प्रवाशांच्या सुविधेसाठी १०५ कोटींची तरतूद

पुढारी वृत्तसेवा

लिफ्ट, सरकते जिने, फूट ओव्हरब्रिज व अन्य सुविधा; माल वाहतुकीसाठी कोल्ड स्टोअरेज, कोल्ड चेन, गोदामे उभारणार

चिपळूण : पुढारी वृत्तसेवा

कोकण रेल्वे प्रवासी सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असून आगामी आर्थिक वर्षात २०.७७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे तर पुढील पाच वर्षांत कोकण रेल्वे प्रवासी सुविधा वाढविण्यासाठी तब्बल १०५ कोटी रुपये खर्च करणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कोकण रेल्वे ही महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांतून जाते. प्रवासी वाहतूक आणि माल वाहतुकीसाठी कोकण रेल्वे महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने आता कोकण रेल्वेकडे अधिक लक्ष दिले आहे. आगामी कालावधीत कोकण रेल्वेने तब्बल २.६ दशलक्ष टन माल वाहतुकीचे उद्दीष्ट ठेवले आहे. माल वाहतुकीबरोबरच प्रवासी वाहतुकीकडेही लक्ष देण्यात येत असून आगामी ५ वर्षांत कोकण रेल्वेने प्रवासी सुविधेसाठी १०५ कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन केले आहे.

यामध्ये विविध स्थानकात लिफ्ट, सरकते जिने, उच्चस्तरीय प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्मचा विस्तार, ए.सी. लाऊन्ज, पॅसेंजर रिझव्हेंशन सिस्टम, काऊंटरवर युपीआय पेमेंट अशी अत्याधुनिक सुविधा कोकण रेल्वे देणार आहे. या शिवाय कोकण रेल्वेकडून पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेसाठी सर्व फूट ओव्हर ब्रिजचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे.

यातून २१ ओव्हर फूट ब्रिज दुरुस्त झाले असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वे विविध उपाययोजना राबवत आहे. एप्रिल २०२६ ते सप्टेंबर २०२६ या दरम्यान को. रे. मार्गावर तब्बल २४५ समर स्पेशल गाड्या सोडण्यात आल्या तर १७९ गणपती गाड्या चालविल्या. आगामी काळात कोकण रेल्वेच्या माध्यमातून विविध सेवासुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली असून रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे कंटेनर सायडिंग व कोल्ड स्टोअरेज विकसित करण्याचे काम सुरू आहे. येत्या वर्षात खेड, चिपळूण, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, मुर्डेश्वर आणि मणकी या स्थानकावरही कोल्ड चेन सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

वेरणा, इंदापूर आणि रत्नागिरी येथे सायलो सुविधा, याशिवाय चिपळूण, खेड, रत्नागिरी आणि झाराप या स्थानकांवर नवीन गोदामांचे नियोजन करण्यात आले आहे. गत अडीच वर्षात कोकण रेल्वेने २० हजार ५९ कोटींचे नवीन प्रकल्प पूर्ण केले असून सध्या २३ हजार ५५२ कोटींचे प्रकल्प कार्यरत आहेत. चालू आर्थिक वर्षात ४०० रिक्त पदांवर भरतीही केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT