सावंतवाडी : कोकण रेल्वे आता केवळ प्रवाशांना मुंबई-गोव्यातून ने-आण करणारी वाहतूक व्यवस्था राहिलेली नसून, ती सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आणि प्रमुख अर्थवाहिनी बनल्याचे स्पष्ट झाले आहे. सावंतवाडी टर्मिनस विकासाची नांदी ठरणार आहे. 2025 च्या दुसर्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर) महसूल आणि प्रवासी वाहतुकीची आकडेवारी यावर शिक्कामोर्तब करत आहे. या तिमाहीत कोकण रेल्वेने सिंधुदुर्गातील केवळ चार प्रमुख स्थानकांतून तब्बल 23.49 कोटींहून अधिक महसूल केवळ तिकीट विक्रीतून मिळवला आहे.
हा कोट्यवधीचा महसूल जिल्ह्याच्या वाहतूक सेवा क्षेत्राशी निगडित असल्याने विकासाला मोठी मदत होत आहे. कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ व सावंतवाडी या चार स्थानकांचा यात समावेश आहे. याशिवाय या रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणामुळे पायाभूत सुविधांमध्येही महत्त्वाची गुंतवणूक झाली आहे. ही स्थानके जिल्ह्याच्या सकल उत्पन्नात थेट महसूल आणि गुंतवणुकीसोबतच, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला अप्रत्यक्षपणे प्रचंड चालना देत आहेत.
या संपूर्ण आर्थिक विकासात सावंतवाडी येथे होणारे रेल्वे टर्मिनस भविष्याचीगेम चेंजर नांदी ठरणार आहे. जेव्हा एखाद्या स्थानकाचे टर्मिनसमध्ये रूपांतर होते, तेव्हा तेथून नवीन, थेट गाड्या सुरू होऊ शकतात. यामुळे प्रवासी संख्येत मोठी वाढ होऊन दळणवळणाची सुविधा अधिक मजबूत होईल, पर्यटनाला चालना मिळेल. याशिवाय, स्थानकाच्या आसपास लॉजिस्टिक्स, पार्सल सेवा, नवीन हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे जाळे उभे राहील, जे मोठ्या प्रमाणावर नवीन रोजगार निर्माण करतील.
या तीन महिन्यांत या चार स्थानकांवर 5.16 लाखांहून अधिक प्रवासी दाखल झाले. यात पर्यटक, सणांसाठी येणारे चाकरमानी आणि व्यावसायिक प्रवाशांचा मोठा समावेश आहे. हे प्रवासी जिल्ह्यात आल्यावर हॉटेल, स्थानिक वाहतूक, मालवणी खाद्यपदार्थ आणि स्थानिक वस्तू (काजू, कोकम, आंबे) यांवर जो खर्च करतात, त्यातून स्थानिक बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढालहोते. रेल्वेचा खरा आणि दूरगामी परिणाम याच अप्रत्यक्ष योगदानात आहे.
या तिमाहीत जिल्ह्यातील स्थानकांवरून 5.49 लाखांहून अधिक प्रवाशांनी परतीचा प्रवास केला. यात प्रामुख्याने मुंबई-पुण्याकडे नोकरी-व्यवसायासाठी जाणारा मोठा वर्ग आहे. हे लोक बाहेर कमावलेला पैसा जिल्ह्यात परत पाठवतात, ज्यामुळे स्थानिकांची क्रयशक्ती वाढते. तसेच जिल्ह्यातील शेतीमाल (आंबा, काजू, फणस, कोकम) आणि मत्स्य उत्पादनांना मुंबईसारखी मोठी बाजारपेठ मिळवून देण्यात रेल्वेचा मोठा वाटा आहे.
ही आकडेवारी सिद्ध करते की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे स्थानके ही केवळ प्रवासी वाहून नेत नाहीत, तर ती पैसा (महसूल), गुंतवणूक (पायाभूत सुविधा) आणि समृद्धी (पर्यटन व व्यापार)देखील जिल्ह्यात आणतात. त्यामुळे सावंतवाडी टर्मिनससारख्या प्रकल्पांमधील गुंतवणूक ही केवळ प्रवाशांची सोय नसून, ती कोकणातील जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला गती देणारी एक धोरणात्मक गुंतवणूक आहे. कोकणवासीयांच्या हितासाठी हे टर्मिनस तातडीने पूर्णत्वास जाणे आवश्यक आहे.