कणकवली : अनिकेत उचले
पावसाळ्यापूर्वी कोकणात, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात, घराघरांत वेगमीसाठी मसाला तयार करण्याची परंपरा आहे. लाल मिरचीसह विविध गरम मसाला साहित्य खरेदी करून कोकणी, मालवणी आणि घाटी मसाल्याची पूड तयार केली जाते. मात्र यंदा आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम थेट या बाजारावर दिसून येत आहे.
मिरची व मसाल्यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या आयात-निर्यातीला अडथळे निर्माण झाल्याने भावात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा मसाला तयार करताना जिल्हावासीयांच्या खिशाला अधिक झळ बसणार आहे.
मंगळवारी कणकवलीतील आठवडा बाजारात लाल मिरची व गरम मसाला साहित्य खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी दिसून आली. पावसाळ्याचे वेध लागल्यानंतर बेगमीच्या तयारीला सुरुवात होत असते; परंतु वाढत्या दरामुळे यंदा खरेदी करताना नागरिकांना विचार करावा लागत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, गतवर्षीच्या तुलनेत मिरचीचे दर दुप्पट-तिप्पट वाढले असून अनेक मसाला साहित्यांमध्ये सुमारे ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
मिरचीचे दर झपाट्याने वाढले
बेडगी मिरचीचा दर गतवर्षी २०० ते २५० रुपये प्रतिकिलो होता, तो यंदा ३०० ते ५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गुंटूर मिरचीचा दर २०० रुपयांवरून सुमारे ३५० रुपयांपर्यंत गेला असून काश्मीरी मिरची ४५० रुपयांवरून थेट ७०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर मसाला तयार करण्यासाठी लागणारे धने, मिरी, खसखस, बडीशेप, मेथी, मोहरी, तीळ, दालचिनी, लवंग, वेलची, जायपत्री, नागकेशर, शहाजिरे, तमालपत्र, जिरे, सुंठ, हिंगखडा आदी वस्तूंमध्येही ३० टक्के वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
गरम मसाला साहित्याचे किलोदर वाढले
(गतवर्षीच्या तुलनेत यंदाचे दर) मिरी : ६०० रु. ८०० रु. खसखस (उंची): १४०० रु. १६०० रु. मसाला वेलची : २००० रु. २२०० रु. जायपत्री : २५०० रु.२८०० रु. रामपत्री : १८०० रु. २००० रु. शहाजिरे : १४०० रु.१५०० रु. हिरवी वेलची : ३००० रु.४००० रु. इंधनटंचाईचा परिणाम वाहतुकीवर
देशात इंधन पुरवठा आणि वाहतुकीवरही
परिणाम झाल्याने ट्रान्सपोर्ट खर्च वाढला आहे. परिणामी बाजारपेठांमध्ये मसाल्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची आवक कमी झाली आहे. याचा थेट परिणाम भाववाढीच्या स्वरूपात दिसत आहे. बाजारात वाढलेल्या दरामुळे नागरिकांची चिंता वाढली असून, परिस्थिती सुधारली नाही तर पुढील काळात मसाल्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
ड्रायफूट्स ही महागले
युद्धामुळे परदेशातून आयात होणाऱ्या ड्रायफूटस्च्या पुरवठ्यात घट झाली आहे. त्यामुळे बाजारात ड्रायफूडची उपलब्धता कमी झाली असून त्यांचे दरही वाढले आहेत. परिणामी ड्रायफूट वापरून बनवले जाणारे पदार्थ कमी प्रमाणात तयार केले जात असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.