Pirwaadi Beach Safety Pudhari
सिंधुदुर्ग

Sindhudurg Sea Tourism | समुद्र बनला धोकादायक... सागरी पर्यटन बंद !

Sindhudurg Sea Tourism | पर्यटकांची या हंगामात तुडुंब गर्दी; बुडण्याच्या दुर्घटनांमुळे हळहळ

पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : पुढारी वृत्तसेवा

तिकडे दक्षिणेकडे मान्सून केरळच्या किनाऱ्यावर आदळत असताना इकडे अरबी समुद्राचे अंतरंग खवळले आहे. रिप करंट असो की अंडर करंट असो यांचा प्रभाव वाढला आहे. गेल्या चार दिवसांत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वच किनाऱ्यांवर पर्यटकांची तुडुंब गर्दी उसळली होती. यात चार पर्यटक बुडाल्याच्या घटना मनाला वेदना देणाऱ्या होत्या. आता मात्र सरकारने मंगळवारी २६ तारखेपासून सागरी पर्यटनाला बंदी घातली आहे.

पर्यटनासाठी समुद्र धोकादायक बनला आहे. समुद्र किनाऱ्याचं सौंदर्य न्याहाळण्यास हरकत नाही; परंतु पाण्यात उतरण्याचा मोह आवरलेलाच बरा, असा सरकारचा सांगावा आहे. यंदा कोकणात अवकाळी पाऊस जरूर पडला. परंतु त्याचा प्रभाव फारसा नव्हता. त्यामुळे मोकळेपणाने पर्यटकांनी मे महिन्यात सिंधुदुर्ग गाठले.

सिंधुदुर्ग किल्ला, मालवणमधील राजकोटमधील उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा पाहणाऱ्यांची गर्दी फार मोठी होती. परंतु मे महिन्याची १७, १८ तारीख जशी उलटली तशा समुद्रातील अंतर्गत हालचाली वाढू लागल्या. तिकडे मान्सून अंदमान-निकोबार बेट पार करून लक्षद्वीपमध्ये पोहोचेपर्यंत समुद्र आणखीनच धोकादायक बनला होता. मान्सूनपूर्व घडामोडी समुद्राच्या पोटात वेगाने घडत होत्या. अशावेळी अनेक पर्यटकांनी उत्साहाने समुद्राच्या लाटांशी भिडण्याचा जीवघेणा प्रयत्न केला.

रत्नागिरीत समुद्र खवळला रत्नागिरी :

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे समुद्र खवळला असून किनारपट्टी भागात उतळ-पुतळ निर्माण झाली आहे. समुद्रात जोरदार वारे वाहत असल्याने लाटा उंच उसळत आहेत. त्यामुळे मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा मत्स्य विभाग आणि प्रशासनाकडून देण्यात आला आहे. रत्नागिरी, जयगड, मिरकरवाडा, राजापूर, गुहागर आणि दापोली किनारपट्टी परिसरात समुद्राची स्थिती बदललेली दिसून येत आहे.

अनेक ठिकाणी मासेमारी नौका सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवण्यात आल्या आहेत. अचानक बदललेल्या हवामानामुळे मच्छीमारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस किनारपट्टी भागात जोरदार वारे आणि पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे समुद्रात जाणाऱ्या बोटी आणि लहान नौकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच किनाऱ्यावर पर्यटकांनीही धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT