वैभववाडी : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत खूप ठिकाणी अश्मकालीन कातळशिल्पे आहेत. सुमारे 200 पेक्षा अधिक ठिकाणी जांभ्या दगडांवर किंवा कातळावर 2000 पेक्षा जास्त ही शिल्पे कोरलेली आहेत. त्याचा निश्चित कालावधी उपलब्ध नसला तरी काही संशोधकांच्या मते ही कातळ शिल्पे 2500 ते 5000 वर्षांपूर्वीची आहेत. यापैकी आणखी एक ठिकाण म्हणजेच वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे येथील कातळ शिल्प होत. ही कातळ शिल्पे आजही दुर्लक्षित असून हा अमूल्य पुरातन ठेवा जतन करायला हवा. यावर संशोधन होणे आवश्यक आहे. असे मत कातळशिल्प अभ्यासक तथा मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त उपमुख्य अभियंता संजय जाधव यांनी व्यक्त केले.
कोकिसरे येथील कातळ शिल्पाबाबत माहिती देताना जाधव म्हणाले, कोकण प्रदेशातील बहुतांश कातळशिल्पे ही जांभ्या दगडात कोरलेली आहेत. परंतु कोकिसरे येथील कातळशिल्पे ही नावाप्रमाणे पूर्णतः कातळावर कोरलेली आहेत. वैभववाडी तालुका मुख्यालयापासून 4 किमी. अंतरावर व कोकिसरे रेल्वे फाटक (तळेरे-कोल्हापूर नॅशनल हायवेवरील) येथून 3 कि.मी. अंतरावर नवाळेवाडी - बौद्धवाडी या जुन्या पायवाट रस्त्यावर ही कातळशिल्पे आहेत. नुकतीच याठिकाणी वैभववाडीतील विविध माध्यमाच्या पत्रकारांनी भेट दिली. सोबत स्थानिक रहिवासीही होते.
नवाळेवाडी-बौद्धवाडी यांना जोडणारी पायवट या कातळ शिल्पावरून जाते. मोठमोठ्या चौकोनी, आयताकार आकारावरून चालताना बुजुर्ग लोक ही पाऊले आहेत असे म्हणायचे. यात कातळावरील निसर्गसौंदर्य म्हणजे बारमाही वाहणारे व उंचावरून पडणारे पाणी म्हणजे बारमाही धबधबे. पूर्वी ग्रामीण लोक याला वजर (उंच जागेवरून पडणारे पाणी) म्हणायचे. पुढे हा धबधबा कोलांटी उड्या घेत शांती नदीला जाऊन मिळतो.पूर्वी कोकिसरे गावाला कोकणचे कॅलिफोर्निया म्हणायचे. बारमाही शेती, सगळीकडे हिरवेगार मळे, पाटातून झुळझुळ वाहणारे पाणी पाहून मन प्रसन्न व्हायचे. आज लोक शेती करत नसल्याने बारमाही हिरवळ नाहीशी झाली आहे. याठिकाणी पूर्वी पाणी कातळावरून वहायचे, ते आता शेतजमिनीतून वाहते व शेतातील चिखल, गाळ एके ठिकाणी धबधब्याजवळच कातळावर वाहून आलेला आहे. तरीही येथील बारमाही वाहणारा धबधबा किंवा त्याचे निसर्गसौंदर्य किंचितही कमी झालेले नाही. उलट कातळावरील पाण्याचा प्रवाह बदलल्याने संपूर्ण कातळशिल्पे दिसत आहेत व पूर्वीचे गैरसमज दूर झालेत.
याठिकाणी असलेली शिल्पे ही मानवी पावले नसून निश्चित आकार असलेली कातळशिल्पे आहेत. त्याला एक संगती आहे. मोठ्या चौकोनात लहानमोठ्या आयताकृती, त्रिकोणी, चौकोनी, गोलाकार दगडी आकारात ही शिल्पे आरेखली आहेत. जसे आपण दगडी बांधकाम करतो व एकावर एक थर रचतो व त्यातील गॅप छोट्या दगडाने भरून काढल्यावर लांबलचक दगडी भिंतीचे चित्र जसे दिसेल अशी प्रथमदर्शनी ही रचना दिसते. तसेच दगडी बांधकाम केल्यावर जसे सिमेंट किंवा चुन्याने सभोवतालचे थर जोडतो तसेच वाटते.
येथील कातळ शिल्प व प्रमाणबद्ध रचना यावर अधिक संशोधन व्हायला हवे. सिंधुदुर्गातील कातळ शिल्प अभ्यासक व मुख्यमंत्री यांचे माजी मुख्य जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत, रत्नागिरीतील निसर्ग यात्री या संस्थेचे कातळ शिल्प अभ्यासक सुधीर रिसबूड यांना तसेच भारतीय पुरातत्त्व खाते यांनाही याबाबत कळविल्याचे संजय जाधव यांनी सांगितले.
या निसर्गरम्य ठिकाणी कातळावर कोरलेली शिल्पे व बारमाही वाहणारा धबधबा पाहायला भेट द्यायला हवी व हा अमूल्य पुरातन ठेवा जपायला हवा. याठिकाणी संपूर्ण कातळ असल्यामुळे पावसाळ्यात ही वाट निसरडी होते त्यामुळे ऑक्टोबर ते मे महिना हा कालावधी भेट देण्यासाठी उत्तम आहे.
कोकणातील इतर कातळ शिल्पे ही छोट्या छोट्या आकारात पाहायला मिळतात. पण येथील शिल्पे ही सुमारे अर्धा किमी. लांब व 20 ते 30 मीटर रुंदीच्या पट्ट्यात सलग रेखाटलेली आढळतात. दोन ठिकाणी तर मुसळ आत जाईल अशा पद्धतीचे होल आहेत. पूर्वी येथून पाणी वाहायचे, त्यामुळे भूमिगत जलसाठा किंवा भूगर्भधारण यासारखी सुद्धा रचना असू शकते. ही कातळ शिल्प दगडी बांधकाम पद्धतीची रचना पाहता एकवेळ असेही वाटते की जमिनीच्या पोटात एक प्राचीन नगरच गडप झाले आहे की काय आणि त्याच्या पाऊलखुणा वरून दिसताहेत, कारण बांधकाम पद्धतीतील असणार्या मोठमोठ्या प्रमाणबद्ध आकारातील भेगा. काही स्थानिक मंडळीच्या मते ही एखादी लिपीही असू शकते.