कुडाळ : कुडाळ -कविलकाटे रायकरवाडी येथील गांजा प्रकरणातील तिसर्या संशयित प्रितेश रोहीदास मसुरकर 32 रा. उभादांडा तालुका वेंगुर्ले याला कुडाळ पोलीसानी उभादांडा इथून त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. यामध्ये त्याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना सुमारे 150 ग्रॅम वजनाचा सापडलेला गांजा जप्त केला आहे. याप्रकारणी प्रितेश मसूरकर याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
कविलकाटे रायकरवाडी येथील एका घरात कुडाळ पोलिसांनी 4 जुलै रोजी छापा टाकून गांजा बाळगल्या प्रकरणी येथील विशाल सुरेश वाडेकर याला ताब्यात घेतले होते.यात संशयिताच्या ताब्यातून 1 किलो 680 ग्रॅम वजनाचा 52 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला होता. कुडाळ पोलीसाना कविलकाटे रायकरवाडी येथे आरोपी विशाल वाडेकर हा आपल्या घरी गांजा विक्रीसाठी आणल्याची बातमी मिळाली होती.
या अनुषंगाने कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी वरिष्ठांच्या आदेशान्वये तेथील कविलकाटे रायकरवाडी येथे आरोपी विशाल यांच्या राहत्या घरी छापा टाकून त्याच्या ताब्यातील गांजा जप्त केला. 52 रुपये किंमतीचा आणि 1 किलो 680 ग्रॅम वजनाचा हा गांजा होता. विशाल याला ताब्यात घेत अटक केले होते. यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विशाल वाडेकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार केतन आनंद सुकी, वेंगुर्ले या दुसर्या आरोपीला 16 जुलै रोजी ताब्यात घेत अटक केली होती. याप्रकरणी त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. यानंतर आता पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार कुडाळ पोलिसांच्या पथकाने वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा येथील प्रितेश मसुरकर यांच्या राहत्या घरी छापा टाकला.
यावेळी पोलिसांनी घेतलेल्या झडतीत त्याच्या घरी सुमारे दीडशे ग्रॅम वजनाचा गांजाही सापडला आहे. पोलिसांनी कविलकाटे व त्याच्या राहत्या घरी सापडलेल्या गांजा प्रकरणी प्रितेश मसुरकर याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण धडे करत आहेत अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.