कणकवली : कणकवली नगरपंचायत हद्दीतील आचरा रोड व इतर ठिकाणी पडलेले खड्डे बुजविण्याचे नियोजन कणकवली नगरपंचायत मार्फत करण्यात आलेले असून त्या करिता निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आचरा रोड हा वर्दळीचा रस्ता असल्याने पोलिस प्रशासनाच्या मदतीने येथील खड्डे रात्री उशिरा किंवा 2 दिवस सदर रस्ता बंद ठेवून करण्यात येणार आहे. सदर रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम नगरपंचायत मार्फत हाती घेण्यात आले होते, परंतु पावसामुळे काम करणे शक्य झालेले नाही. पण आता निविदा प्रक्रिया नंतर तत्काळ सदर काम करण्यात येईल, असे कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी श्रीम.गौरी पाटील यांनी सांगितले.
शहरातील मुख्य चौक ते पोलिस स्टेशनपर्यंतचा रस्ता तसेच शहरातील इतर रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे दै. पुढारीने प्रशासनाचे लक्ष वेधले होते. कणकवली शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण असे वृत्त रविवारी दै. पुढारीमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यामधून शहरातील खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
शहरातील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला असणार्या सर्व्हिस रोडवर ठिकठिकाणी पडलेले खड्डे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत होते. यातील काही खड्डे सिमेंट काँक्रिटने तसेच पेव्हर ब्लॉकने बुजवण्यात आले होते. मात्र त्यानंतरही त्या भागात नव्याने खड्डे पडून त्याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागणार आहे. दै. पुढारीमध्ये या विषयीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची तातडीने दखल घेत कणकवली न. पं. च्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी प्रशासनाकडून खड्डे बुजवण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.