कणकवली : पुढारी वृत्तसेवा
गेली तीन टर्म आम्ही निवडून येतोय ते कणकवलीकरांच्या पाठबळावर, राणेंच्या नाही. शहर विकास आघाडीसाठी आम्ही सर्व पक्षांकडून पाठिंबा मागितला होता. आ. नीलेश राणेंनी तो दिला. पण आमच्या प्रभागात प्रचारासाठी नीलेश राणे कधी आले नाहीत आणि आम्हीही कधी त्यांच्या व्यासपीठावर गेलो नाही, असे प्रत्युत्तर कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी दिले.
गेली वीस वर्षे आम्ही जनतेच्या पाठिंब्यावर निवडून येतोय, त्यामुळे आमचा राजीनामा मागण्याचा अधिकार कुणालाही नाही, असे त्यांनी ठणकावले. आ. नीलेश राणे आणि माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केलेल्या वक्तव्यावर सुशांत नाईक यांनी सोमवारी उपनगराध्यक्ष दालनात पत्रकार परिषद घेतली.
नगरसेवक संकेत नाईक, जयेश धुमाळे आदी उपस्थित होते. सुशांत नाईक म्हणाले, कणकवलीची पहिली निवडणूक आमचे बंधू वैभव नाईक आणि संदेश पारकर यांनी राणेंच्या विरोधात लढवली होती. राणेंच्या उमेदवारांचा पराभव करून संदेश पारकर नगराध्यक्ष तर वैभव नाईक हे उपनगराध्यक्ष झाले होते. त्यानंतरच्या सर्व निवडणुकांत आम्ही कणकवलीकरांच्या पाठबळावर आणि राणेंनी दिलेल्या उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढवून जिंकत आहोत.
जनतेचा पाठिंबा असेल तर पुढील निवडणुका देखील आम्ही जिंकू. सुशांत नाईक म्हणाले, नगरपंचायत निवडणुकीत आम्ही भयमुक्त कणकवलीसाठी शहर विकास आघाडी केली होती आणि सर्व पक्षांनी पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. यात आ. नीलेश राणे यांनी या आघाडीला पाठिंबा दिला, पण ते कधीही आमच्या प्रभागात प्रचाराला आले नव्हते. तसेच मी देखील त्यांच्या व्यासपीठावर किंवा सभेला उपस्थित राहिलो नाही.
पालकमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेमुळेच जिल्ह्यात अवैध धंदे फोफावले
सिंधुदुर्गातील मटका, जुगार, खुलेआम गोवा दारूची विक्री याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार नाहीत, असे विधान पालकमंत्र्यांनी केले आहे. जर या सर्वाला फडणवीस जबाबदार नसतील, तर तुम्ही आहात. पालकमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेमुळेच जिल्ह्यात अवैध धंदे फोफावले आहेत, असाही आरोप सुशांत नाईक यांनी केला
पैसे वाटप आ. चव्हाण यांच्या माध्यमातूनच !
दरम्यान, नगरपंचायत निवडणुकीत राणेंकडून पैसे घेतल्याचा आरोप कणकवलीच्या माजी नगराध्यक्षांनी केला आहे, पण राणेंनी कुठल्या निवडणुकीत पैसे वाटले ते त्यांनी सांगावे. आजवर जे काही पैसे वाटप झालंय ते आ. रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातूनच झालेय, असा टोला देखील सुशांत नाईक यांनी लगावला.