Sindhudurg Local Politics News 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Local Politics News | कणकवली न.पं. स्थायी समितीची अखेर निवड

Sindhudurg Local Politics News | सत्ताधारी पक्षाचे तीन तर विरोधी पक्षाचे दोन सदस्य

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : पुढारी वृत्तसेवा

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कणकवली नगरपंचायत स्थायी समिती निवड मंगळवारी न. पं. परमहंस भालचंद्र महाराज सभागृहात झाली. या समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्ष संदेश पारकर तर सदस्यपदी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक रूपेश नार्वेकर, संजय कामतेकर आणि मेघा गांगण यांची निवड करण्यात आली. एका सदस्याची निवड ईश्वरचिठ्ठीने करण्यात आली. पाच जणांच्या या स्थायी समितीमध्ये तीन सदस्य सत्ताधारी तर दोन सदस्य हे विरोधी पक्षाचे आहेत.

पिठासन अधिकारी गौरी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती निवड सभा झाली. सभेला नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक रूपेश नार्वेकर, संकेत नाईक, जयेश घुमाळे, लुकेश कांबळे, बाळू पारकर, सुमेधा अंधारी, दिपिका जाधव, जाई मुरकर, सुप्रिया नलावडे, मेघा गांगण, संजय कामतेकर, बंडू हर्णे, राकेश राणे, स्वप्निल राणे, मेघा सावंत, आर्या राणे, मनस्वी ठाणेकर, प्रतीक्षा सावंत आदी नगरसेवक व न.पं. कर्मचारी उपस्थित होते. पिठासन अधिकारी गौरी पाटील यांनी स्थायी समिती निवड प्रक्रियेची माहिती दिली.

नियमानुसार स्थायी समिती पदसिध्द अध्यक्षपदी नगराध्यक्ष नगराध्यक्ष संदेश पारकर यांची निवड करण्यात आली तर कोणत्याही विषय समित्या असल्यास त्यांचा सभापती आणि कोणतीही विषय समिती नेमण्यात आली नसेल तर सदस्य म्हणून उपाध्यक्ष यांना निवडले जाते. या न.पं. मध्ये कोणतीही विषय समिती स्थापन न झाल्याने उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांची सदस्यपदी निवड करण्यात आली. त्यामुळे आणखी तीन सदस्यांची निवड करणे आवश्यक होते.

क्रांतीकारी विचार पक्ष आणि भाजपचे समसमान बलाबल असल्याने दोन्ही पक्षांकडून एक एक सदस्य घेण्याचे ठरले. त्या-त्या पक्षाच्या गटनेत्यांकडून नावे घेण्यात आली. त्यानूसार क्रांतीकारी विचार पक्षाकडून सदस्यपदी रूपेश नार्वेकर तर भाजपकडून मेघा गांगण यांचे नाव सदस्य म्हणून देण्यात आले.

त्यानंतर आणखी एक सदस्य निवडावयाचा असल्याने ईश्वर चि‌ट्ठी टाकून तो निवडावा असे पिठासन अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानूसार दोन्ही पक्षांच्या नावांच्या चिठ्या टाकण्यात आल्या. पत्रकार लक्ष्मीकांत भावे यांच्या हस्ते चिट्ठी काढण्यात आली. त्यामध्ये ही चिट्ठी भाजपच्या नावाची आली. त्यानंतर भाजपच्या गटनेत्या सुप्रिया नलावडे यांनी सदस्यपदासाठी संजय कामतेकर यांचे नाव सूचविले.

त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे तीन आणि विरोधी पक्षाचे दोन असे पाच सदस्य स्थायी समितीवर घेण्यात आले. ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली. दरम्यान मागील सभेत स्थायी समिती निवड प्रक्रियेवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये काहीसा वादंग झाला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनूसार मंगळवारी मुख्याधिकाऱ्यांनी स्थायी समिती निवडीसाठी बैठक लावून ही निवड प्रक्रिया नियमानुसार पार पाडण्यात आली.

न.पं.ची आज सर्वसाधारण सभा

कणकवली न.पं.ची सर्वसाधारण सभा बुधवार १८ मार्च रोजी सकाळी ११ वा. न.पं. च्या परमहंस भालचंद्र महाराज सभागृहात होणार आहे. सत्ता बदलानंतर प्रथमच होणाऱ्या या सर्वसाधारण सभेत कोणते निर्णय होतात आणि कोणत्या विषयावर चर्चा होणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT