मुंबई ः संदेश पारकर यांचा सत्कार करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. सोबत ना. उदय सामंत, राजन तेली, खा. श्रीकांत शिंदे, प्रथमेश तेली आदी. 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Politics : सकाळी ठाकरे शिवसेनेकडून सत्कार, रात्री शिंदेंचा आशीर्वाद!

कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर हे शिंदे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा

पुढारी वृत्तसेवा

प्रमोद म्हाडगुत

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मंगळवारी एका दिवसात घडलेल्या घडामोडींनी मोठी चर्चा सुरू झाली आहे. कुडाळ येथे पार पडलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत कणकवलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा ठाकरे शिवसेनेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. मात्र याच सत्कारानंतर अवघ्या काही तासांत संदेश पारकर यांनी थेट मुंबई गाठत उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतल्याने ते शिंदे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मंगळवारी रात्री उशिरा ही भेट मुंबईत झाली. शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत, माजी आमदार राजन तेली, प्रथमेश तेली हे उपस्थित होते. रविवारी 21 तारखेला निवडणुकीचा निकाल लागून विजयी झाल्यानंतर अवघ्या 48 तासांत संदेश पारकर यांनी भेट घेतली आहे. संदेश पारकर हे ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. ते शहर विकास आघाडीचे उमेदवार होते. परंतु त्यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्याचे अधिकृतरित्या जाहीर झाले नव्हते. पक्षीय पादत्राणे बाजूला ठेवून आघाडी केल्याची त्यांची भूमिका होती. मात्र विजयानंतर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे वृत्त नाही.

तत्पूर्वी मंगळवारी सकाळी कुडाळ येथे ठाकरे शिवसेनेची कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, माजी आमदार वैभव नाईक आणि परशुराम उपरकर, गौरीशंकर खोत, सतीश सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीला संदेश पारकर हेही उपस्थित होते. कणकवली नगराध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल संदेश पारकर यांचा ठाकरे शिवसेनेकडून या बैठकीत अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. मात्र सत्कार स्वीकारल्यानंतर ते तातडीने मुंबईकडे रवाना झाले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

या अचानक भेटीमुळे शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आलेले संदेश पारकर शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत का, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. संदेश पारकर हे शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते आणि त्यांना शिवसेनेचे नेते आमदार निलेश राणे यांनी पाठिंबा देऊन त्यांचा प्रचार केला होता. विशेष म्हणजे शिंदे शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत हेही संदेश पारकर यांच्या प्रचाराला आले होते. या दरम्यान संदेश पारकर निवडून आले तर ते शिंदे शिवसेनेत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. आता शिंदे यांची भेट त्यांनी घेतल्यामुळे या चर्चेला जोर आला आहे. संदेश पारकर हे लवकरच शिंदे शिवसेनेत प्रवेश करतील की शहर विकास आघाडीत राहूनच सर्वांशी चांगले संबंध ठेवून राजकारणात पुढे जातील की ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत राहतील हे येणार्‍या काही दिवसात स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT