पोलिस, आरटीओकडून दिखाऊ कारवाई
न.पं. प्रशासनही समस्येप्रश्नी गंभीर नाही
पार्किंग व्यवस्थाही नाहीच
बकालपणाचे घोंगडे भिजतच
कणकवली : कणकवली शहरातून गेलेल्या उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले आहे. अस्ताव्यस्त पार्किंग, विनावापर वर्षानुवर्षे उभी करून ठेवलेली वाहने, काही भंगार गाड्या, ठिकठिकाणी लावलेले स्टॉल, टपर्या, अनेक ठिकाणी पुलाखाली वाढलेले गवत, चिखलाची दलदल आणि माती दगडाचे ढिगारे यामुळे उड्डाणपुलाखाली बकालपणा वाढला आहे.
परिणामी ‘स्वच्छ सुंदर’ कणकवलीच्या सौंदर्याला या बकालपणाचे ग्रहण लागले आहे. माध्यमांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर पोलिस आणि आरटीओकडून पार्किंग केलेल्या वाहनांवर तात्पुरती कारवाई केली जाते. मात्र, अतिक्रमण केलेले स्टॉल, टपर्यांबाबत न.पं. प्रशासनही बघ्याचीच भुमिका घेत आहे. त्यामुळे कणकवली शहराच्या सौंदर्यीकरणात या बकालपणाचा मोठा अडसरा ठरला आहे.
कणकवली शहर हे जिल्ह्याचे मध्यवर्ती व्यापारी केंद्र आणि बाजारपेठ आहे. या शहरातून झालेल्या महामार्ग चौपदरीकरणात उड्डाणपुलाची निर्मिती झाली. मात्र गेल्या चार वर्षांपासून उड्डाणपुलाच्या निर्मितीनंतर या उड्डाणपुलाखालचा परिसर अस्ताव्यस्त पार्किंग आणि अतिक्रमण केलेल्या स्टॉल, टपर्यांनी ग्रासलेला आहे. वर्षानुवर्षे विनावापर असलेली अवजड वाहने, कार उभी करून ठेवण्यात आलेली आहेत. पुलाच्या अनेक गाळ्यांखाली चिखलाची दलदल आणि गवताचे साम्राज्य आहे. काही भागात कचराही साचलेला आहे. त्यामुळे शहराच्या सुशोभिकरणात हा बकालपणा अडसर ठरला आहे.
दीड महिन्यापूर्वी कणकवलीतील व्यापार्यांनी या बकालपणाकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधल्यानंतर न.पं. प्रशासन, पोलिस आणि आरटीओला त्यांनी हे अतिक्रमण तत्काळ हटविण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी पोलिस आणि आरटीओने कारवाई करत काही वाहने हटवली. परंतू, पुन्हा त्याच सायंकाळपासून ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या’ अशी स्थिती होती. न.पं.प्रशासनही या बकालपणाबाबत गंभीर नसल्याचे दिसून येते. काही वेळा पुलाखाली साचलेला कचराही दिसतो परंतू, कोणीच याबाबत गांभीर्याने हा विषय घेत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकीकडे नगरपंचायत स्वच्छ सुंदर शहरासाठी विविध उपक्रम राबवत असताना उड्डाणपुलाखालील बकालपणा मात्र सुशोभिकरणात अडसर ठरत आहे. उड्डाणपुलाखाली अनेक गाळ्यांमध्ये पार्किंग केलेली वाहने उभी असतात. नियमित वाहने पार्किंग करण्यावर आक्षेप नाही. परंतू अस्ताव्यस्त कशाही गाड्या लावलेल्या असतात. विनावापर ट्रक, कार अशी अनेक वाहने पुलाखाली उभी करून ठेवलेली आहेत. वर्षानुवर्षे काही वाहने त्याच अवस्थेत उभी आहेत. अर्थात शहरात पार्किंगची सोय नसल्याने वाहने पार्किंग करणार कुठे? असाही काहींचा आक्षेप असतो. त्याचाही नगरपंचायतीने गांभीर्याने विचार करत पार्किंगची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. केवळ पोलिस आणि आरटीओवर जबाबदारी टाकून हा प्रश्न सुटणार नाही तर न.पं. प्रशासनानेही याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे.
कणकवली शहरातील उड्डाणपुलाखाली जागेच्या सुशोभिकरणासाठी महामार्ग प्राधिकरणने नगरपंचायतीला परवानगी दिली आहे. न.पं.नेही या सुशोभिकरणाचा प्रस्ताव शासनस्तरावर मंजूरीसाठी पाठवलेला आहे. तो मंजूर होईल तेव्हा होईल, परंतू या बकालपणाबाबत ठोस निर्णय न.पं.ला लवकरात लवकर घ्यावाच लागणार आहे.