कणकवली : कणकवली शहरातील सर्व्हिस मार्गासह पटवर्धन चौक ते पोलीस स्टेशनपर्यंतचा मार्ग तसेच अन्य काही रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. पावसावेळी हे खड्डे पाण्याने भरले जात असल्याने या खड्ड्यांमुळे अपघात होवू लागले आहेत. विशेषतः दुचाकीस्वार आणि रिक्षा चालकांना या खड्ड्यांचा अधिक त्रास होत आहे. मात्र या खड्ड्यांना वाली कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कणकवली शहरातील उड्डाण पूलाच्या दोन्ही बाजूने असलेल्या सर्व्हिस रोडची अक्षरशः दैना झाली आहे. श्रीधर नाईक चौक ते एसएम हायस्कूलपर्यंत ठिकठिकाणी सर्व्हिस रोडवर खड्डे पडले आहेत. यातील खड्डे सिमेंट काँक्रीटने तसेच पेव्हर ब्लॉकने भरण्यात आले आहेत. परंतु एक दोन दिवसानंतर पुन्हा त्याठिकाणी खड्डे पडत आहेत. कणकवली बसस्थानक ते पटवर्धन चौक या दरम्यान खड्ड्यांची संख्या अधिक आहे.
तर सर्वाधिक रहदारी असलेल्या कणकवली शहरातील आचरा मार्गावरील पटवर्धन चौक ते पोलीस स्टेशन दरम्यान रस्त्याचीही चाळण झाली आहे. विशेष म्हणजे या रस्त्याला गटारच नसल्याने पावसावेळी अक्षरशः या रस्त्याला नाल्याचे स्वरूप येते. अशावेळी या रस्त्यावरून गाडी चालविणे म्हणजे तारेवरची कसरतच असते. वारंवार याबाबत माध्यमांनी लक्ष वेधूनही याकडे संबंधित यंत्रणेने या रस्त्याच्या दुरावस्थेची दखल घेतलेली नाही. सार्वजनिकबांधकाम विभागाचे लक्ष वेधले असता पोलीस स्टेशनपर्यंत हा रस्ता नगरपंचायत मालकीचा असल्याचे सांगण्यात येते. पण नगरपंचायतही याकडे डोळेझाक करत आहे. त्यामुळे या रस्त्यालाही कोणीच वाली राहीलेला नाही.
या रस्त्यांबरोबरच शहरातीलही काही रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून हे रस्ते दुरूस्त कधी होणार? असा सवाल नागरीकांसह वाहनचालक करत आहेत.