Kankavli City Cleanliness Issu Pudhari
सिंधुदुर्ग

Kankavli City Cleanliness Issue | 'स्वच्छ, सुंदर कणकवली'च्या संकल्पनेलाच डाग !

Kankavli City Cleanliness Issue | रस्त्यांलगत साचणारे कचऱ्याचे ढीग पाहिल्यानंतर नगरपंचायतीच्या स्वच्छ सुंदर कणकवली या संकल्पनेलाच अस्वच्छतेचा डाग लागल्याचे वास्तव समोर येत आहे.

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : अनिकेत उचले

शहरातील काही नागरिकांकडून जाणूनबुजून किंवा हलगर्जीपणाने सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यालगत कचरा टाकण्याचे प्रकार सुरू असल्याने कणकवली शहराच्या स्वच्छतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्त्यांलगत साचणारे कचऱ्याचे ढीग पाहिल्यानंतर नगरपंचायतीच्या स्वच्छ सुंदर कणकवली या संकल्पनेलाच अस्वच्छतेचा डाग लागल्याचे वास्तव समोर येत आहे.

स्वच्छतेचा प्रश्न केवळ जनजागृतीपुरता मर्यादित न ठेवता कचराफेक करणाऱ्यांना शोधून काढून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. कचराफेकूंच्या मागे कोणताही अदृश्य हात नसून त्यांना शोचून नियमांनुसार सरळ करण्याचे उत्तरदायित्व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच संपूर्ण प्रशासनावर असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, कणकवली शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नगरपंचायतीकडून विविध स्वच्छता मोहिमा राबवल्या जात असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात शहरातील काही भागात कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याचे चित्र पुन्हा समोर आले आहे. विशेष म्हणजे याच समस्येबाबत यापूर्वी दैनिक पुढारी मध्ये 'कणकवली शहरात कचराफेक नागरिकांमुळे स्वच्छतेला तडा' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होऊनही नगरपंचायतीकडून कोणतीही ठोस व कृतीशील उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

पटकीदेवी ते रेल्वे स्टेशन जाणाऱ्या जुन्या नरडवे मार्गावरील गणेश सिद्धी कॉम्प्लेक्स समोर परबवाडी कॉर्नर परिसरात पुन्हा कचऱ्याचे ढीग साचले आहेत. याच ठिकाणच्या अस्वच्छतेबाबत यापूर्वी वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही परिस्थिती जैसे थे असल्याने कचरा व्यवस्थापन कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, या ठिकाणी वारंवार कचरा टाकला जात असतानाही त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढलेला नाही. परिणामी परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे.

या रोडवरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनचालक तसेच पादचाऱ्यांची वर्दळ असते. मात्र रस्त्यालगतची अस्वच्छता शहराच्या प्रतिमेलाच धक्का देणारी ठरत आहे. नगरपंचायतीने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला असला तरी प्रत्यक्षात अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा न. पं. कडे नाही. वारंवार एकाच ठिकाणी कचरा दिसून येत असताना संबंधितांवर कारवाई का होत नाही? असा सवाल नागरिकांचा आहे.

शहर स्वच्छतेबाबत प्रशासनाने केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देणे आवश्यक आहे. 'स्वच्छ व सुंदर कणकवली'चा संकल्प प्रत्यक्षात उतरवायचा असेल तर कचराफेकुंवर कठोर कारवाई करून त्यांना सरळ करण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा भटकी कुत्री व जनावरे सर्वत्र पसरवत असल्याने परिसरातील रस्त्यांचे विद्रुपीकरण होत आहे.

याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून हा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे, कचरा टाकणाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करणे आणि कायमस्वरूपी नियंत्रण यंत्रणा उभी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा अस्वच्छतेचे हे चित्र शहराच्या मानगुटीवर कायम बसण्याची भीती आहे.

घंटागाडी वेळेत नाही; कचरा रस्त्यावरच !

रेल्वे स्टेशन ते पटकीदेवी जाणाऱ्या जुन्या नरडवे रस्त्यालगत मोठमोठी कॉम्प्लेक्स उभी राहिली आहेत. या परिसरात सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. यातील काही नागरिक कामानिमित्त सकाळी लवकर घराबाहेर पडत असल्याने घरातील कचरा घंटागाडीच्या ठरलेल्या वेळेत देणे शक्य होत नाही. त्यातच घंटागाडी वेळेवर न आल्याने काही जणांकडून कचरा रस्त्यावर किंवा रस्त्यालगत टाकला जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

आता सन्मान कुणाचा करायचा?

कणकवली शहरातील अस्वच्छता आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाचा मुद्दा नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेतही गाजला होता. या विषयावर सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये जोरदार वादंग पाहावयास मिळाला. विरोधी नगरसेविकेने स्वच्छतेबाबत दक्षता घेणाऱ्या व्यक्तीचा पुरस्कार देऊन सन्मान करावा, अशी मागणी केली होती. त्यावर सत्ताधारी बाजूनेही 'नक्कीच सत्कार व्हावा' अशी प्रतिक्रिया देत अध्यक्षांकडे मागणी करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात शहरातील कचरा व्यवस्थेची स्थिती आजही जैसे थे असल्याने, या परिस्थितीत नेमका सन्मान कोणाचा करायचा? चर्चेतून केवळ शब्दांची आतषबाजी झाली की प्रत्यक्ष कृती होणार, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT