कणकवली : एसटी बसमधील अनेक सीटवर पावसाचे पाणी असल्याने प्रवाशांना उभे राहुनच प्रवास करण्याची पाळी आल्याचा प्रकार नुकताच घडला. कणकवली तालुक्यातील हरकुळखुर्द येथे गेली अनेक वर्षे वस्तीची गाडी जाते. सकाळी 6.30 वा. हरकुळखुर्द ते कणकवली असा प्रवास ही गाडी करते.
या गाडीत नेहमी प्रवाशांची गर्दी असते. विशेषत: कणकवली येथे शिकायला येणार्या विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. हरकुळखुर्द-फोंडाघाट-करूळ-कणकवली असा प्रवास करणार्या या गाडीत सकाळी कणकवली येथे कामावर जाणारे प्रवाशीही असतात.
अलिकडेच या गाडीत मागील अनेक सीटवर पावसाचे पाणी पडले होते. त्यामुळे सीट रिकामी असुध्दा प्रवाशांना उभे राहून प्रवास केला. असे प्रकार अनेकदा घडतात. प्रवाशी तक्रारही करतात, परंतु हे प्रकार काही थांबत नाहीत. कोंडये गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य उत्तम तांबे हेसुध्दा या गाडीतून प्रवास करतात.
त्यांनी सांगितले, रात्री जेव्हा वस्तीला गाडी उभी असते तेव्हा गाडीच्या खिडकीच्या काचा उघड्या ठेवल्या जातात. रात्री पाऊस पडला की सीटवर पाणी येते. जर खिडक्या बंद ठेवल्या तर गाडीत पाणी येणार नाही. यापुढे तरी अधिकार्यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी उत्तम तांबे यांनी केली आहे.