कणकवली ः कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडीच्या नगरसेवकपदाचे उमेदवार सुशांत नाईक व संकेत नाईक यांचा विजय लक्षवेधी ठरला. सुशांत नाईक व संकेत नाईक यांना पराभूत करण्यासाठी भाजपने त्यांच्याविरोधात तगडे उमेदवार देऊन राजकीयदृष्ट्या नाईक बंधूंचा ‘अभिमन्यू’ करण्यासाठी ‘चक्रव्यूह’रचले होते. मात्र, नाईक बंधूंनी डावपेच खेळत चक्रव्यूह भेदून आपला विजय ‘खास’ ठरवला अन् यासोबतच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारक यांना देखील आपल्या बालेकिल्ल्यातून मताधिक्य देत विरोधकांना आपणच ‘धुरंदर’ असल्याचे दाखवून दिले आहे.
कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजप विरोधात सर्व विरोधकांनी शहर विकास आघाडीची मोट बांधली. शहर विकास आघाडी अंतर्गत क्रांतिकारी विचार पक्षाने भाजपच्याविरोधात तगडे आव्हान निर्माण केले. प्रभाग 15 मधून भाजपच्या विश्वजित रासम यांच्याविरोधात शहर विकास आघाडीने कै. श्रीधर नाईक यांचे कनिष्ठ पुत्र संकेत नाईक यांनी लढत दिली. प्रभाग 17 मधून राष्ट्रवादी( अजित पवार) गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्याविरोधात कै. श्रीधर नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र, ठाकरे युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लढत दिली. नाईक बंधूंचा पराभव करण्यासाठी भाजपच्या चाण्यक्यांनी चक्रव्यूह रचला होता. प्रचारदरम्यान नाईक बंधूंच्या विरोधात रान उठवून त्यांना पूर्णपने कोंडीत पकडले गेले. भाजपच्या कडव्या आव्हाना पुढे नाईक बंधूंनी एकोप्याने निवडणुकीला सामोरे जात गनिमी काव्याने यश मिळवले.
प्रभाग 15 मध्ये 80टक्के तर प्रभाग 17 मध्ये 77.59 टक्के मतदान झाले. प्रभाग 15 मध्येे भाजपचे विश्वजित रासम यांना 150 मते तर शहर विकास आघाडीचे संकेत नाईक यांना 234 मते मिळाली. 84 मतांनी नाईक यांनी रासम यांचा पराभव केला. या प्रभागातून टक्केवारीनुसार झालेल्या आकडेवारीत संकेत नाईक यांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांना 80 मताचे मताधिक्य मिळवून दिले. प्रभाग 17 मधून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांना 195मते तर शहर विकास आघाडीचे सुशांत नाईक यांना 359मते मिळाली. सुशांत यांनी 164 मतांनी अबिद यांचा पराभव केला. परंतु या प्रभागातून भाजपचे नगराध्यक्षपदाचे समीर नलावडे यांना 9 मतांचे मताधिक्य मिळाले. 15 व 17 प्रभागातील नाईक बंधूंचा विजय शहर विकास आघाडी गटात उत्साह द्विगुणीत करणारा ठरला. या प्रभागांतून भाजपचे राजकीय चक्रव्यूह भेदून नाईक बंधूंनी प्रतिस्पर्धांना पराभवाची धूळ चारून विजय खास बनवला. विशेष म्हणजे या दोन्ही प्रभागांमधील निवडणूक बहुचर्चित ठरली होती. यात नाईक बंधूंनी आपला विजय सुखकर करत नेतृत्वही सिद्ध केले. नाईक बंधूंच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी आणि श्रीधर नाईक प्रेमींनी जल्लोष करीत गुलाल उधळून विजयोत्सव साजरा केला. न. पं. नगराध्यक्ष निवडणुकीत शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी भाजपचे समीर नलावडे यांचा 145 मतांनी पराभव करून 17 वर्षांनंतर नगराध्यक्ष बनले. त्यामुळे एकंदरीतच संदेश पारकर यांनी 17 वर्षानंतर राजकीय कारकिर्दीत दमदार कमबॅक केले आहे.