कणकवली : सराईत चोरटा सचिन माने उर्फ लखन कुलकर्णी याला ताब्यात घेताना एलसीबी व कणकवली पोलिसांचे पथक.
Kankavali Burglary Arrest
कणकवली : कलमठ येथे घरफोडी करून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून 1 लाख 73 हजारांचा मुद्देमाल चोरणारा सराईत चोरटा सचिन राजू माने उर्फ लखन अशोक कुलकर्णी (रा. पंढरपूर, जिल्हा सोलापूर) याला एलसीबी सिंधुदुर्ग आणि कणकवली पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने गोकर्ण कर्नाटक येथून 14 जून रोजी सायंकाळी अत्यंत शिताफीने ताब्यात घेतलेे. त्याला न्यायालयात हजर केले असता 18 जून पर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कलमठ बिडयेवाडी येथे 2 जून रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कुलूपबंद असलेले चार बंगले अज्ञात चोरट्याकडून फोडण्यात आले होते. ही चोरी करतानाचे फुटेज सीसीटीव्ही कॅमेर्यात रेकॉर्ड झाले होते. यातील एक घर मालक संजय सुभाष सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 1 लाख 73 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल चोराने लंपास केला होता.
कलमठ घरफोडी गुन्ह्याच्या तपासावेळी, घटनास्थळास दिलेली भेट आणि त्यादरम्यान मिळालेले संशयित आरोपी याचे सीसीटीव्ही फुटेज, संशयित आरोपीचा घटनास्थळावरील वावर, गुन्हा करण्याची पद्धत आणि अभिलेख या सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास करून सदरचा गुन्हा रेकॉर्ड वरील आरोपी सचिन राजु माने उर्फ लखन अशोक कुलकर्णी (रा. पंढरपूर जिल्हा सोलापूर) याने हा गुन्हा केला असावा हा अंदाज वर्तवून त्या दृष्टीने पुढे तपास एलसीबी आणि कणकवली पोलिसांच्या पथकाने सुरू केला होता.
आरोपी सचिन माने याची गोपनीय माहिती पोलिसांनी प्राप्त केली. तसेच त्याचे मित्र, व मैत्रिणी, जवळचे नातेवाईक याविषयी इत्यंभूत माहिती संकलित केली. त्यात आरोपी सचिन राजु माने उर्फ लखन अशोक कुलकर्णी याचाच कलमठ चोरीत सहभाग निश्चित होत असल्याचे दिसून आले. त्या दृष्टीने समांतर तपास सुरू असताना आरोपी सचिन याचे वास्तव्य गोकर्ण, राज्य- कर्नाटक या ठिकाणी असलेबाबत तांत्रिक विश्लेषणाद्वारे निष्पन्न झाले. लागलीच एलसीबी आणि कणकवली पोलिसांच्या पथकाने 14 जून रोजी आरोपी सचिन माने याला गोकर्ण, राज्य-कर्नाटक या ठिकाणाहून शीताफिने ताब्यात घेतले. त्याचेकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली असून गुन्हा उघड झालेला आहे.
सराईत चोरटा सचिन माने याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला कणकवली न्यायालयात हजर केले असता 18 जून पर्यंत चार तदवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक महेश शेडगे करत आहेत.