Silver gold stolen Kankavali
कणकवली : सिंधुदुर्गात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, आता चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिल्याची घटना कणकवली शहरात घडली आहे. पोलिस ठाण्यापासून अवघ्या काही पावलांवर असलेल्या भालचंद्र ज्वेलर्स या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी तब्बल सव्वादहा लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. बुधवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या धाडसी चोरीमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
कणकवलीतील पटवर्धन चौकाजवळ, शाळा क्रमांक 1 समोर असलेल्या सना कॉम्प्लेक्समध्ये मंगेश सदानंद तळगांवकर यांचे ’भालचंद्र ज्वेलर्स’ नावाचे दुकान आहे. बुधवारी पहाटे सुमारे अडीच ते तीनच्या सुमारास, दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणारे डॉ. संतोष केळकर यांना शटर उघडण्याचा आवाज आला. त्यांनी तातडीने तळगावकर यांच्या मुलाला फोन करून माहिती दिली. तळगावकर यांच्या मुलाने मोबाईलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा प्रयत्न केला असता, ते बंद असल्याचे लक्षात आले. त्यामुळे मंगेश तळगावकर यांनी मुलासह दुकानाकडे धाव घेतली असता, दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
चोरट्यांनी कुलूप न तोडता, कटावणीसारख्या हत्याराने शटरची पट्टी वाकवून आत प्रवेश केला. आत शिरताच त्यांनी सीसीटीव्हीचे तोडले. मात्र, त्यापूर्वीचे काही क्षण कॅमेर्यात कैद झाले असून, त्यात रेनकोट, हातमोजे आणि मास्क घातलेले चार चोरटे दिसत आहेत. चोरट्यांनी दुकानातील सुमारे 6 लाख रुपये किमतीचे 15 किलो चांदीचे दागिने, साडेतीन लाख रुपये किमतीचे जवळपास 50 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इतर ऐवज असा एकूण 10 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र चोरटे फरार झाले होते. श्वानपथक, ठसे तज्ज्ञ आणि न्यायवैद्यक पथकालाही पाचारण करण्यात आले, मात्र दिवसभर तपास करूनही चोरट्यांचा कोणताही सुगावा लागला नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्यासह वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत.
मंगेश तळगावकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अधिक तपास करत आहे.
कणकवली पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर भरवस्तीत असलेल्या भालचंद्र ज्वेलर्समध्ये चोरट्यांनी चोरी केली. बिनदिक्कतपणे चोरटे चोरी करून पसारही झाले. यावरून चोरटे किती शिरजोर झाले आहेत हे दिसून येते. मंगळवारी रात्री ते बुधवारी सकाळपर्यंत पाऊस होता. चोरट्यांनी पावसाचा फायदा घेत डाव साधला. आता या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.