कणकवली : जानवली-कृष्णनगरी येथील दत्त मंदिरातील चोरीस गेलेली दत्त मूर्ती गुरुवारी सकाळी 7 वा. च्या सुमारास चोरी झालेल्या दत्त मंदिरानजीकच रस्त्यावर नायलॉनच्या पिशवीवर ठेवलेली दिसून आली. या मूर्तीवर केवळ मूर्तीवरील त्रिशूळ आणि श्वानांचा काही भाग नव्हता, त्यामुळे चोरट्यांनी मूर्ती नेमकी कशाची आहे, हे तपासण्यासाठी चोरल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान, गुरुपौर्णिमेच्या दिवशी या चोरट्यांना सद्बुद्धी सुचली आणि त्यांनी चोरलेली दत्त मूर्ती परत आणून ठेवली, असे भाविकांतून बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, या चोरट्यांचा माग काढण्यासाठी एलसीबी पोलिसांचे पथक कसून तपास करत असताना चोरट्यांनी मात्र बिनदिक्कतपणे मूर्ती परत आणून ठेवली आणि पोलिसांना त्यांचा मागही लागत नाही, हे आश्चर्य म्हणावे लागेल.
5 जूलै रोजी मध्यरात्री जानवली-कृष्णनगरी येथील ओमकार मधुकर मोहिते यांच्या घरासमोरील अंगणात असलेल्या स्वयंभू दत्तमंदिराच्या दरवाजाची कुलूप लावलेली कडी चोरट्यांनी कटरने कापून आत प्रवेश करत मंदिरातील पिवळसर धातूची सुुमारे 5 हजार रु. किमतीची 1 फुटी दत्त मूर्ती चोरली होती. विशेष म्हणजे चोरटे चोरी करत असताना मंदिरातील सीसीटिव्हीचा सायरन वाजल्याने घाईगडबडीत चोरट्यांनी मूर्ती चोरली होती. परंतु त्यांच्याकडील 5 राऊंडने (गोळ्या) भरलेले पिस्टल (पिस्तूल) व एक लोखंडी कटावणी तेथेच टाकून चोरट्यांनी पोबारा केला. भरलेले पिस्टल घेऊन चोरटे चोरी करण्यासाठी आल्याने जानवलीसह कणकवली परिसरात एकच खळबळ उडाली होती.
या चोरीच्या घटनेचा तपास कणकवली पोलिसांबरोबरच एलसीबी पोलिस करत होते. त्यासाठी वेगवेगळ्या चेकनाक्यांवरचे आणि शहरातील सीसीटिव्ही कॅमेरे पोलिस तपासत होते. त्याचबरोबर सीसीटिव्हीत पूर्वी रेकी करताना कैद झालेले संशयितांचे चेहरे आणि घटनेदिवशी मिळालेले फुटेज यावरुन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न एलसीबी टिम गेले काही दिवस करत होते.
चोरट्यांनी चोरलेली मूर्ती सापडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मुळात चोरट्यांनी मूर्ती चोरली तर ती आणून का ठेवली? चोरट्यांचा या मागचा उद्देश काय? चोरटे नेमके कुठल्या भागातील आहेत? गेले अनेक दिवस पोलिस या चोरट्यांच्या मागावर असताना पोलिसांना या चोरट्यांचा छडा कसा लागला नाही? चोरटे मूर्ती ठेवून कोणत्या मार्गाने गेले असतील? चोरीच्या वेळी चोरट्यांनी राऊंडने भरलेले पिस्टल घटनास्थळी सोडून गेले होते, त्यावरुन हे चोरटे सराईत आहेत, त्यांचा माग काढण्यात पोलिसांना यश येणार का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले आहेत.
गुरुवारी सकाळी अचानक हायवेवरुन जानवली-कृष्णनगरीकडे जाणार्या रस्त्याच्या फाट्यावर एका नायलॉनच्या पिशवीवर ठेवलेली दत्तमूर्ती तेथील वॉचमनला दिसून आली. पोलिसांना माहिती मिळताच एलसीबी पोलिसांनी मूर्ती ताब्यात घेतली. बुधवारी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी ती आणून ठेवल्याचा अंदाज पोलिस निरिक्षक अतुल जाधव यांनी व्यक्त केला.